फलटण नगराध्यक्षपदासाठी लढत निश्चित?; राजे गटाकडून अनिकेतराजे तर महायुतीकडून समशेरसिंह यांचे नाव आघाडीवर


स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण खुले’ प्रवर्गासाठी आरक्षित होताच, शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पदासाठीची प्रमुख लढत आता निश्चित झाली असून, राजे गटाकडून अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर महायुतीकडून माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

सोमवारी मंत्रालयात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या नावाची घोषणा करत सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. राजे गटाकडून अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असून, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अनिकेतराजे यांचा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केल्याने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे, महायुतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. कालच त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तसेच, “फिक्स नगराध्यक्षच” अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करत शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

या दोन प्रमुख नावांव्यतिरिक्त अन्य कोणता प्रबळ उमेदवार रिंगणात उतरणार का, तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षासारखे इतर पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटांकडून उमेदवारी न मिळालेले नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!