
स्थैर्य, फलटण, दि. 6 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी भारतीय जनता पार्टीकडे (भाजप) प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी मागितली आहे. भाजपने संधी दिल्यास ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती शहा यांनी दिली आहे.
अनुप शहा यांनी यापूर्वी फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजे गटाकडून माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
जर भाजपकडून अनुप शहा यांना उमेदवारी निश्चित झाली, तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये माजी विरोधी पक्षनेते विरुद्ध माजी नगराध्यक्ष अशी हायव्होलटेज लढत होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

