फलटण पोलिसांची भूमिका दुटप्पी? डीजे, लेझर लाईटच्या वापरावर कारवाई शून्य; आश्वासने हवेत विरली

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशालाही केराची टोपली; राजकीय दबावाच्या आरोपाने पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात


स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : गणेशोत्सवापूर्वी ‘डीजेमुक्त’ वातावरणासाठी बैठका आणि सर्वेक्षणांचा धडाका लावणाऱ्या फलटण शहर पोलीस प्रशासनाने, प्रत्यक्षात मिरवणुकीच्या दिवशी डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू केलेल्या लेझर लाईट बंदीच्या आदेशालाही फलटणमध्ये केराची टोपली दाखवण्यात आली. पोलिसांची ही दुटप्पी भूमिका राजकीय दबावामुळे आहे की अन्य कोणत्या कारणामुळे, असा थेट सवाल आता विचारला जात आहे.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी गणेश मंडळे आणि शांतता कमिटीसोबत बैठका घेऊन डीजेमुक्त उत्सवासाठी सहकार्याचे आवाहन केले होते. “नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, काल (दि. ०६) झालेल्या मिरवणुकीत चित्र पूर्णपणे उलटे दिसले. शहरातील प्रमुख मार्गांवर नियमांना पायदळी तुडवत डीजेचा दणदणाट सुरू होता, पण पोलीस प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत होते.

केवळ डीजेच नव्हे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात बंदी घातलेल्या लेझर लाईटचा वापरही फलटणमधील मिरवणुकात सर्रासपणे करण्यात आला. यावरून, “नक्की फलटण सातारा जिल्ह्यात येते का? उर्वरित सातारा जिल्ह्यासाठी वेगळे नियम आणि फलटणसाठी वेगळे नियम आहेत का?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

या सर्व प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते युवराज शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गतवर्षीच्या तुलनेत यंदा डीजेचा आवाज सर्वाधिक होता, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तरीही पोलीस राजकीय दबावामुळे की अर्थपूर्ण व्यवहारामुळे कारवाई टाळत आहेत, हेच समजत नाही,” असे शिंदे म्हणाले.

तर सामाजिक कार्यकर्ते अमीर (भाई) शेख यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. “ज्याप्रमाणे शहरात बॅनर बंदीचा ठराव झाला, त्याच धर्तीवर कायमस्वरूपी डीजे बंदीसाठी न्यायालयात दाद मागण्याची गरज आहे. मिरवणुकांमध्ये आता गणरायाच्या दर्शनापेक्षा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावी नगरसेवकांचे फोटोसेशन आणि बॅनरबाजीच जास्त दिसत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. एकंदरीत, स्थानिक आणि जिल्हा पोलिसांच्या आदेशाचे पालन न झाल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!