
स्थैर्य, फलटण, दि. 8 ऑक्टोबर : धुमाळवाडी येथे तीन महिन्यांपूर्वी एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला लुटून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणाचा छडा लावण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, धुमाळवाडी येथे सुरेखा भुजबळ (वय ७०) या पायी घरी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर त्यांनी भुजबळ यांच्या गळ्यातील दागिने आणि पैशांचे पाकीट जबरदस्तीने हिसकावून त्यांना ढकलून दिले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. पाच महिन्यांच्या तपासानंतर, दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी सांगवी येथे नातेवाईकाला भेटायला येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून खलील रज्जाक जमादार (वय ३२) आणि तानाजी नाथा लोखंडे (वय ३०, दोघेही रा. सांगवी, ता. फलटण) या दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर फलटण ग्रामीण, लोणंद आणि वडूज पोलीस ठाण्यात महिला आणि वृद्धांना लुटल्याचे इतर ८ गुन्हे दाखल आहेत. या अटकेमुळे गेल्या ४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक दरोड्याच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.