दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण शहर पोलीसांनी मोठ्या शिताफीने दोन वेगवेगळ्या कारवाईत सापळा रचून अवैध गुटख्याची वाहतूक करणार्यांवर कारवाई करत गुन्ह्यातील वाहनासह सुमारे 13 लाख 39 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत फलटण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.9 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत फलटण शहरातील नाना पाटील चौक व दहिवडी चौक येथून अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी दोन वेगवेगळी पथके नाना पाटील चौक व दहिवडी चौक येथे पाठवली. महिंद्रा एसयुव्ही – 500 गाडी क्रमांक एम.एच.10 बी.एफ.7878 ही संशयित गाडी नाना पाटील चौक येथे शिवाजी चौकाच्या दिशेकडून आली असता त्या ठिकाणच्या पथकाने गाडीची झडती घेतल्यानंतर गाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असणारे विमल नावाचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु व इतर गुटखा मिळून आले. या गाडीतील इसमांनी आपली नावे समीर खानसाहेब आत्तार (वय 32) व संग्रामसिंह ज्ञानदेव बरकडे (वय 25), दोघेही राहणार जावली, ता.फलटण असे सांगितले.
दुसर्या कारवाईत दविडी चौक येथे कोळकी कडून आलेल्या एम.एच.4 सी.जे.5483 क्रमांकाच्या मारुती सुझूकी वॅगनर गाडीला अडवून पोलीसांनी झडती घेतली असता या गाडीमध्ये विमल नावाचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू, इतर गुटखा असे प्रतिबंधित असणारे अन्न पदार्थ आढळून आले. सदर वाहनातील इसमाने आपले नाव महेंद्र आगमोगम कुंडवर उर्फ आण्णा (वय 36), रा.लक्ष्मीनगर, फलटण असे सांगितले.
या दोन्ही कारवाईतील चारचाकी वाहने व प्रतीबंधीत असणाारा गुटखा असे मिळून 13 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल फलटण पोलीसांनी ताब्यात घेतला असून याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहिदास सोणवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.
या कारवाईत सातारा जिल्हा पालीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, पोलीस नाईक शरद तांबे, पोलीस हवालदार चंद्रकांत धापते, रमेश फरांदे, महिला पोलीस हवालदार अनिता पानसरे, अशोक वाडकर, पोलीस कॉन्स्टेबल सुजित मेंगवाडे, अचुत जगताप यांनी सहभाग घेतला.