
फलटणमध्ये नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीने विमानतळ परिसरात प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवली. २५ ते ३० किलो कचरा नगरपालिकेकडे सुपूर्द.
स्थैर्य, फलटण, दि. २० जानेवारी : फलटण शहरात पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या वतीने रविवारी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत प्लास्टिक कचरा संकलन व स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विमानतळ परिसरातील एका ठिकाणी तब्बल २५ ते ३० किलो प्लास्टिक कचरा गोळा करून तो योग्य व्यवस्थापनासाठी फलटण नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण, वन्यजीव व पक्ष्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी संस्थेने हा उपक्रम राबवला. संकलित केलेला कचरा वेगळ्या पद्धतीने वर्गीकृत करून पुढील प्रक्रियेसाठी नगरपालिकेकडे देण्यात आला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्लास्टिकमुळे परिसर अस्वच्छ होतोच, शिवाय अनेक वन्यजीव, पक्षी व पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीने यावर्षी ५० रविवार सातत्याने फलटण शहर व नजीकच्या परिसरात सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत प्लास्टिक कचरा संकलन व स्वच्छता उपक्रम राबवण्याचा ठाम संकल्प जाहीर केला आहे. पुढील रविवारी होणाऱ्या उपक्रमाची वेळ व ठिकाण शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन निसर्ग संरक्षणासाठी आपला वेळ द्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागासाठी ७५८८५३२०२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
