
फलटण पंचायत समितीच्या नूतन सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून आज दि. १६ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या अटीतटीच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 16 मार्च : फलटण तालुक्यातील राजकारणाचे प्रमुख केंद्र असलेल्या ‘फलटण पंचायत समिती’च्या सत्तेवर आता कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीच्या नूतन सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचा आणि निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अखेर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. आज सोमवार, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी हा निवडणुकीचा थरार रंगणार असून, सत्तेच्या या साठमारीमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
फलटण पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण विकासाची अत्यंत महत्त्वाची नाडी मानली जाते. त्यामुळे या पंचायत समितीवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तालुक्यातील सर्वच प्रमुख राजकीय गटांनी जोरदार कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी वेगाने घडत असून, सदस्यांची पळवापळवी आणि गुप्त बैठकांच्या सत्रांना मोठा वेग आला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात फलटणचे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत ‘नमुना – अ चे जोडपत्र’ अधिसूचनेनुसार, दिनांक १६ मार्च रोजी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये सभापती व उपसभापती या दोन्ही अत्यंत प्रतिष्ठेच्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत दोन्ही पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) विशेष सभेच्या ठिकाणी नियुक्त पिठासीन अधिकाऱ्यांकडे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्राचे नमुने त्याच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर खरी राजकीय धाकधूक सुरू होणार आहे. सकाळी ११.३१ ते दुपारी १२.०० या वेळेत विशेष सभेच्या कामकाजाला अधिकृत सुरुवात होऊन दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची काटेकोर छाननी केली जाईल. या छाननी प्रक्रियेत कोणाचे अर्ज टिकणार आणि कोणाचे बाद होणार, यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
यानंतर, दुपारी १२.०१ ते १२.३० हा अर्धा तासाचा वेळ उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. राजकारणातील खरी कसोटी याच वेळेत लागणार असून, बंडखोरी रोखण्यासाठी आणि विरोधकांचे अर्ज मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय दबावतंत्राचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. या नाट्यमय घडामोडींनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर दुपारी १२.३१ वाजल्यापासून पुढे आवश्यक असल्यास प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी करून बहुप्रतिक्षित निकाल जाहीर केला जाईल. फलटण पंचायत समितीची ही निवडणूक बिनविरोध होणार की सत्तेसाठी प्रत्यक्ष मतदानाचा रणसंग्राम पाहायला मिळणार? आणि सभापती व उपसभापती पदाच्या या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर कोणता गट आपला उमेदवार बसवण्यात यशस्वी ठरणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता १६ तारखेलाच मिळणार असल्याने संपूर्ण तालुक्याची धाकधूक वाढली आहे.

