
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : फलटण पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी सदस्यपदांची आरक्षण सोडत सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फलटण) येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीनुसार ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठीच्या जागा आरक्षणाद्वारे निश्चित केल्या जाणार आहेत.
त्याचबरोबर, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांसाठीची आरक्षण सोडतही त्याच दिवशी, म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. जिल्ह्यातील इतर सर्व पंचायत समित्यांची आरक्षण सोडतही त्याच दिवशी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये पार पडेल.
या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी वेळेवर व योग्य ठिकाणी हजर राहावे, असे आवाहन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.