
स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आज सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीत, हे पद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला’ (OBC महिला) यासाठी राखीव झाले आहे. या निर्णयामुळे सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक दिग्गजांची संधी हुकली असून, तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
फलटण पंचायत समितीमध्ये यंदाच्या निवडणुकीत १६ सदस्य असणार आहेत. सभापतीपद हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. मात्र, आजच्या सोडतीत हे पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण ११ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता सदस्यपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.