
फलटण पंचायत समितीची निवडणूक जवळ आली असतानाच प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. प्रभारी गटविकास अधिकारी श्री. कुंभार निवृत्त झाल्याने आणि वर्षभरापासून पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कारभार ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०५ जानेवारी : एकीकडे फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असताना, दुसरीकडे पंचायत समितीचा प्रशासकीय डोलारा सांभाळण्यासाठी ‘सेनापती’च उपलब्ध नसल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून फलटण पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी (BDO) नसल्याने कारभार ‘रामभरोसे’ चालला असून, आता प्रभारी अधिकाऱ्यांचीही सेवा समाप्त झाल्याने “फलटणला पूर्णवेळ अधिकारी मिळणार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पंचायत समिती ही ग्रामीण विकासाचा कणा मानली जाते. मात्र, फलटणसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात गेल्या एक वर्षापासून गटविकास अधिकारी पद पूर्णवेळ भरलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन गटविकास अधिकारी (वर्ग-१) चंद्रकांत बोडरे यांची बदली झाली. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक गटविकास अधिकारी श्री. कुंभार यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
गेल्या काही महिन्यांपासून श्री. कुंभार हेच पंचायत समितीचा गाडा हाकत होते. मात्र, आता त्यांचाही सेवापूर्ती (निवृत्ती) समारंभ नुकताच संपन्न झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गटविकास अधिकारी पदाची खुर्ची रिक्त झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशासकीय प्रमुखाचे पद रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आगामी काही दिवसांत पंचायत समितीची निवडणूक जाहीर होण्याची चिन्हे आहेत. अशा काळात आचारसंहितेची अंमलबजावणी आणि दैनंदिन कामकाजासाठी पूर्णवेळ आणि सक्षम अधिकाऱ्याची गरज असते. मात्र, प्रभारी राजवरच कारभार चालवल्याने विकासाचे प्रश्न रेंगाळत असल्याची चर्चा आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन फलटण पंचायत समितीला तत्काळ पूर्णवेळ गटविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

