माळजाई मंदिर नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; मुख्याधिकारी निखिल जाधव, पत्रकार अरविंद मेहता यांच्या हस्ते महाआरती

लायन्स क्लब व मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


स्थैर्य, फलटण, दि. २३ सप्टेंबर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त लायन्स क्लब फलटण आणि माळजाई मंदिर व उद्यान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवरात्र व दसरा महोत्सवा’ला सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी फलटण नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव व ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी सपत्नीक महाआरती केली. यावेळी मुख्याधिकारी जाधव यांनी उत्सवासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी महोत्सवाची तपशीलवार माहिती दिली. महोत्सवात दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे. दि. २३, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ ते ९ या वेळेत अनुक्रमे शिवरुद्र झांजपथक, श्रीराम झांजपथक आणि रुद्रावतार झांजपथक यांचे ढोल-ताशा वादन होणार आहे. तसेच दि. २६, २७ आणि २९ सप्टेंबर रोजी ‘ओपन दांडिया व गरबा’ चे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी महिलांसाठी भोंडला, उपवासाचे फराळ स्पर्धा आणि नवरंग साडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी होम-हवन विधी, तर बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्यातर्फे विशेष कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी पारंपरिक दसरा महोत्सवाने उत्सवाची सांगता होईल.

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांना लायन्स क्लबचे दिलीप शिंदे, स्वीकार मेहता, जगदीश गरवालिया, महेश साळुंखे, निखिल सोडमिसे, अर्जुन घाडगे, विजय लोंढे-पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.


Back to top button
Don`t copy text!