
-
क्रांतीसिंह नाना पाटील चौकात गेल्या १५-२० दिवसांपासून पाणीपुरवठा वाहिनीला गळती
-
वर्दळीच्या चौकात पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त
-
दोन दिवसांवर आलेल्या राम यात्रेच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या दुरुस्तीची मागणी
स्थैर्य, फलटण, दि. 21 नोव्हेंबर : फलटण शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून ही गळती सुरू असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र, नगरपरिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
भर चौकात पाण्याचे पाट
क्रांतीसिंह नाना पाटील चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. येथे मोठी वर्दळ असते. मात्र, पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी पसरले आहे. यामुळे रस्त्यावर चिखल आणि निसरडा भाग तयार झाला असून पादचारी आणि वाहनचालकांना येथून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पाईपलाईन फुटून दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पाण्याची नासाडी होत असताना आणि नागरिकांना त्रास होत असतानाही नगरपालिकेच्या संबंधित विभागाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
राम यात्रेपूर्वी दुरुस्ती आवश्यक
फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेच्या काळात शहरात आणि विशेषतः मुख्य चौकांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत चौकात पाणी आणि चिखल असल्यास भाविकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे यात्रेचा मुहूर्त साधून तरी नगरपालिकेने ही गळती थांबवावी आणि रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

