फलटण नगरपरिषदेत आज ‘सत्तावाटपाचा’ फैसला! स्थायी समिती, बांधकाम, आरोग्य सभापतीपदी कोणाची लागणार वर्णी? विरोधी पक्षनेता कोण? शहराचे लक्ष


फलटण नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या आणि स्थायी समितीच्या निवडी आज (दि. २६) पार पडत आहेत. खासदार गटाकडून महत्त्वाच्या सभापती पदांवर कोणाला संधी मिळणार आणि ‘राजे गटा’चा विरोधी पक्षनेता कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 26 फेब्रुवारी : फलटण नगरपरिषदेच्या राजकीय आखाड्यात आज (गुरुवार) ‘सत्तावाटपाचा’ सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण फैसला होणार आहे. नगरपरिषदेच्या सर्वाधिकार संपन्न अशा स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची निवड आज संपन्न होत आहे. स्पष्ट बहुमत असलेल्या सत्ताधारी ‘खासदार गटा’कडून स्थायी समितीत कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागणार? आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बांधकाम, आरोग्य व पाणीपुरवठा सभापतीपदी कोणाला संधी मिळणार? तसेच, विरोधी ‘राजे गटा’चा विरोधी पक्षनेता नक्की कोण होणार? याकडे आता संपूर्ण फलटण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात ‘खासदार गटा’ने नगरपालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून समशेरसिंह नाईक निंबाळकर विराजमान झाले असून ते स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले या शिक्षण समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत.

बांधकाम, आरोग्य आणि पाणीपुरवठा समितीसाठी मोठी चुरस

नगरपालिकेचा बहुतांश विकासनिधी आणि महत्त्वाचे निर्णय हे प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम समिती, आरोग्य व स्वच्छता समिती आणि पाणीपुरवठा समिती यांच्या माध्यमातून घेतले जातात. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या समित्यांचे सभापतीपद आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी सत्ताधारी गटातील अनेक दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या समित्यांवर कोणाला संधी देतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

विरोधी पक्षनेता कोण? अनिकेतराजे की गुंजवटे आबा?

सत्ताधाऱ्यांच्या सत्तावाटपासोबतच विरोधी ‘राजे गटा’च्या गोटातही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. नगरपरिषदेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी ‘विरोधी पक्षनेता’ हे पद अत्यंत महत्त्वाचे असते. या पदासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत आलेले युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला नगरपालिकेच्या कामकाजाचा गाढा अनुभव असलेले माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे (आबा) यांच्याकडेही हे पद सोपवले जाऊ शकते.

याचबरोबर, स्थायी समितीमध्ये विरोधी राजे गटाकडून एका सदस्याची निवड होणार आहे. या एका जागेवर अनिकेतराजे जाणार की पांडुरंग गुंजवटे? यावरही आज शिक्कामोर्तब होणार आहे.

आज सकाळी ११ वाजल्यापासून नगरपरिषदेच्या सभागृहात या विशेष सभेला सुरुवात होणार असून, दुपारी १२.१५ नंतर या सर्व समित्यांच्या रचना आणि सभापतींच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे दुपारपर्यंत फलटण नगरपरिषदेचे संपूर्ण राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!