फलटण नगरपरिषदेत ‘सत्तावाटपाची’ उत्सुकता शिगेला! स्थायी आणि विषय समित्यांवर ‘खासदार गटा’कडून कोणाची लागणार वर्णी? २६ तारखेला उलगडणार सस्पेन्स


फलटण नगरपरिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ‘खासदार गटा’कडून स्थायी आणि विषय समित्यांवर कोणाला संधी मिळणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. २६ तारखेला होणाऱ्या विशेष सभेत सभापती निवडीचा सस्पेन्स संपणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २२ फेब्रुवारी : फलटण नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘खासदार गटा’ने ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून समशेरसिंह नाईक निंबाळकर हे बहुमताने विराजमान झाले असून, नगरपरिषदेच्या सभागृहातही ‘खासदार गटा’चे निर्विवाद वर्चस्व आणि स्पष्ट बहुमत सिद्ध झाले आहे. सत्तास्थापनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर, आता येणाऱ्या २६ तारखेला होणाऱ्या ‘सत्तावाटपाकडे’ संपूर्ण फलटण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

येत्या गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सदस्य व सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पष्ट बहुमत असल्याने सर्वच समित्यांवर ‘खासदार गटा’चा झेंडा फडकणार हे निश्चित आहे. मात्र, या अत्यंत प्रतिष्ठेच्या समित्यांमध्ये रणजितदादा कोणाकोणाला संधी देणार? आणि कोणत्या विषय समितीच्या सभापतीपदी नक्की कोण विराजमान होणार? याबाबत नगरसेवकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे असणार ‘पदसिद्ध’ अध्यक्ष!

नगरपालिकेच्या नियमानुसार काही समित्यांचे अध्यक्षपद हे पदावरूनच (Ex-officio) निश्चित झालेले असते. त्यानुसार नगरपालिकेची सर्वाधिकार संपन्न आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘स्थायी समिती’ (Standing Committee) ही थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नियंत्रणाखाली असणार आहे. ते या समितीचे ‘पदसिद्ध अध्यक्ष’ म्हणून कामकाज पाहणार आहेत.

तसेच, नगरपालिकेच्या ‘शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती’च्या अध्यक्षपदाची धुरा उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले या ‘पदसिद्ध अध्यक्ष’ म्हणून यशस्वीपणे सांभाळणार आहेत. या दोन महत्त्वाच्या समित्यांचे नेतृत्व निश्चित असल्याने आता उर्वरित समित्यांकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

स्थायी समितीत कोणाला मिळणार ‘एंट्री’?

नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीमध्ये नगरसेवकांमधून सदस्यांची निवड केली जाते. पालिकेचा सर्व आर्थिक आणि धोरणात्मक गाडा याच समितीतून हाकला जातो. त्यामुळे या समितीत जाण्यासाठी सत्ताधारी ‘खासदार गटा’च्या नगरसेवकांमध्ये चुरस आहे. खासदार गटाकडून स्थायी समितीत कोणत्या मातब्बर आणि अनुभवी नगरसेवकांना घेतले जाणार? तसेच सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि नियोजन व विकास यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषय समित्यांच्या ‘सभापती’ पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या २६ तारखेच्या विशेष सभेतच मिळणार आहेत.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांसह नव्या दमाच्या तरुण नगरसेवकांनाही या सत्तावाटपात योग्य तो न्याय देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!