
फलटण नगरपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून आलेले अनिकेतराजे नाईक निंबाळकर की ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे? याचा फैसला २६ फेब्रुवारीला होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २२ फेब्रुवारी : नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षांसह स्पष्ट बहुमत मिळवून ‘खासदार गटा’ने सत्ता स्थापन केली आहे. सत्ताधाऱ्यांनी आपला गड सर केल्यानंतर आता नगरपरिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षाचा आवाज कोण बुलंद करणार? म्हणजेच पालिकेचा ‘विरोधी पक्षनेता’ नक्की कोण होणार? याकडे संपूर्ण फलटण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
विरोधी ‘राजे गटा’कडून या महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या पदासाठी दोन प्रमुख नावांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
अनिकेतराजे की गुंजवटे आबा?
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून पुन्हा नगरपालिकेत दाखल झाले आहेत. त्यामुळे तरुण नेतृत्व म्हणून अनिकेतराजे हेच विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणार? की नगरपालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे (आबा) यांच्याकडे हे पद सोपवून त्यांच्या अनुभवाचा फायदा राजे गट घेणार? याबाबत शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
स्थायी समितीत कोणाची वर्णी लागणार?
विरोधी पक्षनेतेपदासोबतच आणखी एका प्रतिष्ठेच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फलटण नगरपरिषदेच्या सर्वाधिकार संपन्न अशा ‘स्थायी समितीत’ विरोधी राजे गटाच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर कोणाची वर्णी लागणार, याचीही उत्सुकता आहे. या एका जागेवर श्रीमंत अनिकेतराजे जाणार की पांडुरंग गुंजवटे यांची निवड होणार? यावरही पालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या प्रमाणावर खलबते सुरू आहेत.
स्वीकृत नगरसेवकाला ‘विरोधी पक्षनेता’ होता येते का?
दरम्यान, या राजकीय घडामोडींत एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दाही चर्चेत आला आहे. ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून पालिकेत प्रवेश केल्यानंतर संबंधित सदस्याला थेट ‘विरोधी पक्षनेता’ या पदावर विराजमान होता येते का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा कायदेशीर स्पष्टता समोर आलेली नाही.
मात्र, या सर्व राजकीय ‘सस्पेन्स’चा पडदा येत्या २६ फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. येत्या सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी राजे गटाकडून विरोधी पक्षनेता आणि स्थायी समिती सदस्य कोण असणार, या प्रश्नांची अधिकृत उत्तरे फलटणकरांना मिळणार आहेत.
