फलटण नगरपरिषदेच्या आखाड्यात समशेरसिंह x अनिकेतराजे! पण खरी लढत रामराजे आणि रणजितसिंहांच्या प्रतिष्ठेची. वाचा सविस्तर…


  • फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

  • भाजपकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर तर शिवसेनेकडून अनिकेतराजे नाईक निंबाळकर रिंगणात

  • निवडणूक दोघा उमेदवारांची असली तरी प्रतिष्ठा मात्र दिग्गजांची पणाला

स्थैर्य, फलटण, दि. 20 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत दोन बड्या राजकीय घराण्यांतील वारसदार आमनेसामने आले आहेत.

भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून (शिंदे गट) विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शड्डू ठोकला आहे.

पुत्राच्या स्थापत्येसाठी रामराजेंची ताकद

आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्या पुत्राला, अनिकेतराजे यांना राजकारणात स्थिर करण्यासाठी पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक रामराजे यांच्यासाठी केवळ एक पालिका निवडणूक नसून, अनिकेतराजे यांच्या राजकीय भवितव्याची पायाभरणी ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.

रणजितसिंहांचे ‘मिशन फलटण’

दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. आगामी काळातील तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी ही निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. रणजितसिंह यांनी अत्यंत बारकाईने नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करून समशेरसिंह यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.

फलटणमध्ये चर्चांना उधाण

ही लढत कागदोपत्री जरी समशेरसिंह विरुद्ध अनिकेतराजे अशी दिसत असली, तरी फलटण शहरात मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे. ही निवडणूक आता उमेदवारांपुरती मर्यादित राहिलेली नसून ती थेट ‘रामराजे विरुद्ध रणजितसिंह’ अशी झाली आहे. दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने फलटणच्या राजकीय आखाड्यात मोठी रंगत आली आहे.


Back to top button
Don`t copy text!