
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फलटण नगरपरिषदेने खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांसाठी तक्रार निवारण व नुकसान भरपाई समिती गठीत केली आहे. तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर. वाचा सविस्तर.
स्थैर्य, फलटण, दि. १२ डिसेंबर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यावर गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फलटण नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी विशेष समितीची स्थापना केली आहे.
उच्च न्यायालयाचा दणका
खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू व अपघात यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र. ७१/२०१३) दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्ते दुरुस्ती आणि नुकसान भरपाईबाबत समिती स्थापन करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार फलटण नगरपरिषदेने ही कार्यवाही केली आहे.
तक्रार निवारण समिती
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे:
-
अध्यक्ष: श्री. निखिल जाधव (मुख्याधिकारी) – ८०८७९०६९५०
-
सदस्य: श्री. तेजस पाटील (कार्यालय अधीक्षक) – ९८८१०२२१६५
-
सदस्य: श्री. रत्नंजन गायकवाड (नगर अभियंता) – ९४०५२३२६७५
-
सदस्य: श्री. मंगेश शिंदे (उपनगर अभियंता) – ९४२२५३०४२३
-
सदस्य: श्री. प्रतीक जाधव (स्थापत्य अभियंता) – ९९७५००६०५८
नुकसान भरपाईसाठी विशेष समिती
खड्ड्यांमुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपघात झाल्यास, त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये मुख्याधिकारी निखिल जाधव आणि सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती नीना बेदरकर यांचा समावेश आहे.
नागरिकांना आवाहन
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी या समितीकडे किंवा थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

