फलटणमध्ये सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पालिका ‘ॲक्शन मोड’वर! सभापती राहुल निंबाळकरांकडून पहाटे ३ वाजता जुन्या गावठाण भागाची पाहणी; आज पालिकेत विशेष बैठक


फलटण शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर व पदाधिकाऱ्यांनी जुन्या गावठाण भागात पहाटे ३ वाजता पाहणी केली. पाणीप्रश्नी आज सायंकाळी ५ वाजता पालिकेत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 10 मार्च : फलटण शहरात सुरळीत आणि सुनियोजित पाणीपुरवठा करण्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता नगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पालिका थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये आली असून, याच पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी थेट पहाटे ३ वाजता शहरात उतरून पाणीपुरवठ्याची पाहणी केली.

पहाटे ३ वाजल्यापासून शहरात पाहणी

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच फलटण नगरपालिकेत एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर, नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा आणि माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी पहाटे ३ वाजल्यापासून शहरातील जुन्या गावठाण भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यामध्ये प्रामुख्याने शंकर मार्केट, शिवाजी रोड, दत्तनगर, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, मारवाड पेठ आणि तेली गल्ली या जुन्या गावठाण भागांचा समावेश होता. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पाण्याचा दाब आणि वितरणातील अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

पाणीप्रश्नी आज सायंकाळी ५ वाजता पालिकेत बैठक

जुन्या गावठाणमधील प्रभाग क्रमांक ४, ८ आणि १२ मधील नागरिकांना योग्य दाबाने आणि वेळेत पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांच्या अडचणी व मते जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांनी आज सायंकाळी ५.०० वाजता नगरपरिषदेत एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत नागरिकांशी थेट संवाद साधून पाणीपुरवठ्याबाबतचे महत्त्वाचे व धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!