स्वच्छ भारत अभियानात फलटण नगर परिषद बाजी मारणारंच; मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कसलीय कंबर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०८ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
स्वच्छ भारत अभियानात यावर्षी बाजी मारायचीच, असा निर्धार करून कार्यरत असलेले फलटण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी संपूर्ण नगर परिषद प्रशासन गतिमान केले आहे. परिणामी फलटणकर नागरिकांची उत्स्फूर्त साथ लाभत असल्याने यावर्षी फलटण शहर स्वच्छ, सुंदर होणारच, असा विश्वास सर्व स्तरातील फलटणकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन नगर परिषद सफाई कर्मचार्‍यांना उत्तम प्रकारचे २ ड्रेस, गमबुट, डोक्याला टोपी, महिला कर्मचार्‍यांना साडी अशा कपड्यांचे वितरण आज नगर परिषदेत स्थानिक वृत्तपत्र प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी या अभियानाबाबत माहिती दिली.

स्वच्छ भारत अभियान राबविताना संपूर्ण देशातील सफाई कर्मचार्‍यांना एकसारखा परंतु सुरक्षित पोशाख असला पाहिजे ही संकल्पना घेऊन केंद्र शासनाने सूचविलेल्या पोषाखाचे वितरण महाराष्ट्रात सर्वप्रथम फलटण नगर परिषदेने केल्याचे निदर्शनास आणून देत कामगारांना सर्व सुविधा आणि वेतन व वेतनेतर सर्व देणी देण्यातही ही नगर परिषद सर्वात पुढे असल्याचे नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले आहे.

नगर परिषद कर्मचार्‍यांकडून शहराची नियमीत सफाई होत असताना शहरातील दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनी रात्री दुकाने किंवा हॉटेल बंद करताना कचरा रस्त्यावर टाकू नये यासाठी सायंकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत नगर परिषद घंटा गाडी सदरचा कचरा संकलनाचे काम करते. त्याचबरोबर सायंकाळी बाजारपेठ स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी नियुक्त करून संपूर्ण बाजारपेठ स्वच्छ केली जात असल्याने सकाळी फिरायला जाणार्‍या नागरिकांना धुळीचा त्रास होत नाही. शहरातील खुल्या जागा, पडकी घरे उतरवून घेऊन मालमत्ताधारकांनी स्वच्छता अभियानात साथ करावी, असे आवाहन केल्यानंतर त्याबाबतही संबंधित नागरिकांची उत्तम साथ लाभल्याचेही संजय गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फलटण नगर परिषदेने केंद्र शासनाच्या योजनेची सर्वप्रथम अंमलबजावणी करून मुख्याधिकारी यांनी आम्हा कर्मचार्‍यांवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून आम्ही स्वच्छता अभियानात फलटण महाराष्ट्रात सर्वप्रथम येईल यासाठी सतत प्रयत्नशील राहू व प्रथम क्रमांक खेचून आणू, अशी ग्वाही यावेळी कर्मचार्‍यांनी दिली.

कार्यक्रमास शहरातील विविध वृत्तपत्र प्रतिनिधी आणि नगर परिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!