दैनिक स्थैर्य | दि. २२ डिसेंबर २०२४ | फलटण |
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार्या नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशन आणि रेस्ट हाऊसमधील व्यवस्थेची पाहणी केली. या जागेची आणि फिल्टरेशन प्लान्टची दुरवस्था बघून त्यांनी या जागेला ‘ऑफिसर क्लब’ घोषित करण्याची सूचना नगरपालिकेचे प्रशासक निखिल मोरे यांच्याकडे केली. त्याद़ृष्टीने कार्यवाहीस सुरुवात करा, असे आमदार सचिन पाटील यांनी मोरे यांना सांगितले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्याकडून फलटण शहराला पिण्यासाठी मिळणार्या पाण्याचे पोर्स्टमार्टम सुरू असून फिल्टरेशन प्लान्टची दुरवस्था बघून ते म्हणाले की, जुन्या काळातील नगरपालिकेचे प्रशासक, नगराध्यक्ष किंवा पाणपुरवठा समितीचे अध्यक्ष असतील त्यांनी या रेस्ट हाऊस व फिल्टरेशन प्लान्टच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘रामसे बंधूंची ही पुरानी हवेली’ झाली आहे. या जागेवर चित्रपट निर्माण करण्यासारखी घाण या जागेत पाहायला मिळत आहे. या फिल्टरेशन प्लान्टची सर्व ऑटोमेशन असलेली सिस्टीम बंद पडलेली आहे. या पाण्यात शैवाळ तयार झाल्याचे दिसत आहे. येथील सर्वच्या सर्व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स फिल्टरेशन बंद आहे. मात्र, असे असूनही येथील कर्मचारी प्रामाणिक काम करून जेवढे स्वच्छ पाणी देता येईल, याचा प्रयत्न करत आहेत.
माजी खासदार रणजितसिंह पुढे म्हणाले की, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी या जागेची स्वच्छता राहावी, मेंटेनन्स राहावा यासाठी या जागेला ‘ऑफिसर्स क्लब’ करावे. त्यामुळे राजकीय व्यक्ती या जागेचा वापर करणार नाहीत. येथे ऑफिसर्स क्लब करून या जागेला सिक्युरिटी द्यावी.
यावेळी आमदार सचिन पाटील म्हणाले की, पहिल्यांदा या जागेतील फिल्टरेशन प्लान्ट सुरू करून घ्यावा, जेणेकरून या पाण्याचा ‘पीएच’ मेेंटेन राहील. त्यामुळे पाण्यामुळे होणार्या रोगराईचे प्रमाण थांबेल. पाणी स्वच्छ जरी दिसत असले तरी अजूनही चांगल्या दर्जाचे स्वच्छ पाणी शहराला आपल्याला द्यायचे आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, त्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्या करायच्या आहेत. या प्लान्टमधील इलेक्ट्रिकल बाबी, मोटर्स असतील आणि सर्वात महत्त्वाचे येथे सिक्युरिटी गार्ड नेमणे फार महत्त्वाचे आहे. येथे सिक्युरिटी गार्ड नेमल्याने बाहेरचा व्यक्ती आत येणार नाही, पाण्यात काही टाकू शकणार नाही, फक्त ऑफिसर्स लोकच येथे येतील. या पद्धतीने काळजी घ्यावी. असलेले रेस्ट हाऊस पुन्हा स्वच्छ करून ऑफिसर्सच्या वापरात यावे, यासाठी ‘ऑफिसर्स क्लब’ करावा. जेणेकरून पाणीही या शहराला स्वच्छ मिळेल व ऑफिसरसाठी चांगले बसण्याचे ठिकाण होईल. या जागेचे नूतनीकरण करावे, अशा सूचना आमदार सचिन पाटील यांनी प्रशासक निखिल मोरे यांना यावेळी दिल्या.
या भेटीवेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.