स्थैर्य, फलटण, दि. १४ : फलटण नगरपरिषदेने नागरिकांना वाढीव घरपट्टीची बिले दिली असून सदरील घरपट्टीची बिले तातडीने रद्द करावी. घरपट्टीची बिले रद्द करेपर्यंत नागरिकांनी घरपट्टीची बिले भरू नये असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केलेले आहे.
फलटण नगरपरिषदेने सुमारे दोन वर्षांपूर्वी फलटण शहरातील सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण केलेले होते. सर्वेक्षण झाल्यानंतर सर्वच मालमत्तेच्या करामध्ये सुमारे तीन पटीने वाढ करण्यात आली. वाढीव मालमत्ता कराविरोधात फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ वकील नरसिंह निकम, नगरसेवक अशोकराव जाधव यांनी आंदोलन केलेले होते. त्या वेळी मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलेले होते. परंतु अजूनही मालमत्ता करामध्ये कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांनी कर भरू नये असे आवाहन नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले आहे.
सध्या जगावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच नागरिक व व्यापारी हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. फलटण नगरपालिकेने या बाबत तातडीने कार्यवाही करून घरपट्टीची बिले कमी करून द्यावीत. फलटण शहरातील नागरिकांनी जुन्या कमी रकमेच्या बिलाची व वाढीव रकमेच्या बिलाची झेरॉक्स प्रत आमच्याकडे जमा करावीत असेही अशोकराव जाधव यांनी आवाहन केलेले आहे.