
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या आत्मविश्वासात वाढ?
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी फलटण दौऱ्यानंतर दोनच दिवसांनी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने फलटणच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आणले आहे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा दर्शवणाऱ्या या स्टेटसमध्ये “फलटण नगरपालिका लोडिंग…” असा आशय असल्याने, आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे आणि विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच, रविवारी, २६ ऑक्टोबर रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फलटण येथे भव्य कृतज्ञता मेळावा पार पडला होता. या मेळाव्याचे आयोजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले होते. या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केले होते आणि त्यांना एक प्रकारे ‘क्लीन चिट’ दिल्याचे मानले जात होते. याच पार्श्वभूमीवर, नाईक निंबाळकर यांनी ठेवलेल्या या स्टेटसमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.
“फलटण नगरपालिका लोडिंग…” या वाक्यातून आगामी काळात फलटण नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणारच, असा दृढ विश्वास व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फलटण नगरपालिकेवर राजे गटाची सत्ता होती. ही सत्ता आगामी निवडणुकीत उलथवून टाकण्याचा भाजपचा निर्धार या स्टेटस मधून दिसून येत आहे.
आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत असताना, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भाजपने व्यक्त केलेला हा आत्मविश्वास विरोधकांना विचार करायला लावणारा आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या स्टेटसमुळे आता नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप कोणती रणनीती आखणार आणि त्यांचे संभाव्य उमेदवार कोण असतील, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
