स्थैर्य, फलटण : फलटण नगर परिषद जुने मुलींचे वसतीगृह इमारतीमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या सर्व त्रुटी दूर करुन सुसज्ज करोना केअर सेंटरची उभारणी करण्यात आल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे व सर्व नगरसेवक/नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या प्रयत्नाने फलटण नगर परिषदेच्या वर्षानुवर्ष बंद अवस्थेत असलेल्या मुलींच्या वसतीगृहाच्या इमारतीमध्ये करोना हाॅस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. व्यकटेश धवन, डॉ. सुभाषराव गायकवाड यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार शहरातील डॉक्टरांच्या मदतीने अत्यावश्यक साधने सुविधांसह सुसज्ज रुग्णालय उभे राहिल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.
या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सीजन व मॉनिटर सुविधा तसेच रुग्णांसाठी लागणारी सर्व प्राथमिक औषधे उपलब्ध आहेत. सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून स्वच्छतागृह व इतर परिसर साफ करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केल्याने स्वच्छतेचा प्रश्न सुटला आहे. या हॉस्पिटलमध्ये दिवसभरात 3 वेळा स्वच्छता केली जाते. साबण, हँडवॉश, सॅनिटायझर या सर्वांचा वापर केला जातो. रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय केली आहे. जेवण, नाष्टा, चहा वगैरे सुविधा दर्जेदार असून रुग्णांना झोपण्यासाठी चांगली सोय केली जाते त्या मध्ये उशी, गादी बेडशीट या सर्व बाबीचा समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे फलटण कोविड सेंटर मध्ये दिवसातून 4 वेळा डॉक्टर हे रुग्णांची तपासणी करतात. महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल फलटण, लाईफ लाइन हॉस्पिटल फलटण, निकोप हॉस्पिटल (जे.टी.पोळ),उप जिल्हा रुग्णालय, फलटण, आय.एम.ए. फलटण शाखा, फलटण डॉक्टर्स असोसिएशन या हॉस्पिटल व डॉक्टर्सच्या देखरेखीखाली फलटणच्या कोविड सेंटरची व्यवस्था उत्तम ठेवली जात आहे.
डॉ. संजय राऊत, डाॅ. जे. टी. पोळ, डॉ. पी. पी. गुंगा (राजवैद्य) यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉ. सौ. सुनीता पोळ, डॉ. सौ. संजीवनी संजय राऊत, डॉ. मेघना बर्वे, डाॅ. खराडे, डाॅ.जोशी, डाॅ. सागर गांधी, डॉ. विक्रांत रसाळ व शहरातील आय. एम. ए., पी. एम. ए. चे सर्व सभासद डॉक्टर वेळोवेळी तपासणी व वैद्यकीय सेवेसाठी फलटण करोना केअर सेंटर मध्ये येतात. येथील रुग्णांच्या देखभाल व औषधोपचारासाठी 24 तास नर्स व वॉर्ड बॉय कार्यरत आहेत.