फलटणमध्ये प्रचाराचा धुरळा पुन्हा उडणार; दिग्गजांच्या सभांचा धडाका


फलटण पालिका निवडणुकीसाठी २० डिसेंबरला मतदान होणार असून आजपासून प्रचाराचा जोर वाढणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते प्रचाराला येणार आहेत. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. 12 डिसेंबर : न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण नगरपालिका निवडणुकीच्या तारखा बदलल्याने काही काळ थंडावलेला प्रचार आता पुन्हा तापणार आहे. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आजपासून (शुक्रवारी) भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा ‘खासदार गट’ आणि विरोधातील शिवसेना प्रणित ‘राजे गट’ या दोन्ही बाजूंनी प्रचाराचा जोर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

घरोघरी प्रचारावर भर

निवडणुकीसाठी वेळ कमी असल्याने दोन्ही गटांच्या प्रमुखांनी उमेदवारांना आक्रमक प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक उमेदवाराने मतदारांच्या घरोघरी जाऊन आपल्या कामकाजाची माहिती द्यावी आणि मतदारांशी थेट संवाद साधावा, असे आवाहन गटप्रमुखांकडून करण्यात आले आहे.

राज्यातील दिग्गजांच्या तोफा धडाडणार

येत्या काही दिवसांत फलटणमध्ये प्रचारासाठी स्टार प्रचारक दाखल होणार आहेत. खासदार गटाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते प्रचाराला येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शिवसेना प्रणित राजे गटाच्या प्रचारासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्टार प्रचारक फलटणमध्ये सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

असा आहे बदलेला कार्यक्रम

फलटण नगरपालिकेसाठी पूर्वी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार आता २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. तारखांमधील बदलामुळे प्रचारात आलेली शिथिलता आता संपली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

थंडीत राजकीय वातावरण तापले

सध्या शहरात थंडीची लाट पसरली असली तरी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजे गटातील काही दिग्गजांना खासदार गटात प्रवेश देऊन आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. त्यामुळे दोन्ही गटांत काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे.


Back to top button
Don`t copy text!