अण्णा भाऊ साठे योजनेचा निधी वळवला; भीम आर्मीचे उपोषणाचे हत्यार


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेचा निधी नियमबाह्य वळवून फसवणूक केल्याचा भीम आर्मीचा आरोप. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरला आमरण उपोषण.

स्थैर्य, फलटण, दि. 17 डिसेंबर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजने अंतर्गत प्राप्त झालेला २०२३-२४ या वर्षाचा निधी कोणताही शासन निर्णय नसताना इतरत्र वळवून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी संघटनेने केला आहे. याप्रकरणी संबंधित मुख्याधिकारी, अभियंता आणि पदाधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी संघटनेने ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

भीम आर्मीने दिलेल्या निवेदनुसार, फलटण नगरपालिकेने २०२३-२४ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत आलेला दलित वस्ती सुधारणेचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळवला. कोणताही शासन निर्णय किंवा परिपत्रक नसताना हा निधी मटण मार्केट परिसराचा विकास करण्यासाठी आणि श्रीराम कारखान्याच्या मालकीच्या जागेवर रस्ता विकसित करण्यासाठी वापरण्यात आला.

विशेष म्हणजे, ज्या जागेवर रस्ता करण्यात आला, ती जागा नगरपालिकेची असल्याचा दावा केला जात असला तरी, श्रीराम कारखाना व्यवस्थापन त्यावर मालकी हक्क दाखवून नोटीस बजावत आहे. त्यामुळे हा निधी खाजगी कामासाठी वापरून शासनाची फसवणूक झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

प्रशासनाच्या अहवालावर आक्षेप

याप्रकरणी भीम आर्मीने सातत्याने जिल्हाधिकारी आणि सहायक आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. निवेदने, आंदोलने आणि मोर्चे काढूनही प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरावे सादर करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते, तरीही फलटण नगरपालिकेने दिशाभूल करणारी माहिती दिली असून कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

गुन्हे दाखल करण्याची मागणी

निधीचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता आणि ठरावावर सह्या करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी) आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ३० डिसेंबर २०२५ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!