फलटण नगरपालिका निवडणूक: रामराजेंच्या विश्वासू हरिश काकडेंना संधी मिळणार का?


स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : फलटण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागताच, शहरातील राजकीय वर्तुळात संभाव्य उमेदवारांविषयी चर्चांना उधाण आले आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाकडून कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच, त्यांचे विश्वासू सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हरिश काकडे (अप्पा) यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे.

फलटण नगरपालिकेचे राजकारण गेल्या चार दशकांपासून रामराजे नाईक निंबाळकर यांच्याभोवती केंद्रित राहिले आहे. त्यांनी निवडलेला उमेदवार हाच विजयी उमेदवार, हे समीकरण शहरात रूढ झाले आहे. जेष्ठ नगरसेवक जेठा मधुकर काकडे आणि विजय काकडे यांनी रामराजेंचा विश्वास सार्थ ठरवत अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. आता याच परंपरेत एका नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

हरिश काकडे हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आपल्या पत्नीच्या साथीमुळेच आपण सामाजिक कार्यात पूर्णपणे झोकून देऊ शकलो, असे ते नम्रपणे सांगतात. काकडे यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय पातळीवरही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊनच रामराजे यांनी त्यांच्यावर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती.

काकडे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. फलटण नगरपालिकेतील दिव्यांगांसाठी निधी मिळवून देणे, गरजू नागरिकांना पेन्शन योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच बार असोसिएशनच्या माध्यमातून न्याय हक्कांसाठी झालेल्या आंदोलनांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नगरसेवक सनी अहिवाळे यांच्या सहकार्याने त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.

केवळ शहरापुरते मर्यादित न राहता, हरिश काकडे यांनी फलटण तालुक्यातील बौद्ध आणि मातंग समाजासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात रामराजे यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. मागील निवडणुकीत मंगळवार पेठेतून नगरसेवक सनी अहिवाळे यांच्यासोबत काम करत त्यांनी उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हरिश काकडे यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी पाहता, त्यांच्या निष्ठेचे आणि कार्याचे फळ म्हणून यावेळच्या नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर त्यांना संधी देतील का, अशी चर्चा सध्या शहरात, विशेषतः मंगळवार पेठेत सुरू आहे. काकडे यांच्या पत्नीच्या माध्यमातून त्यांना संधी दिली जाईल, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे आता राजे गटाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!