
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : फलटण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागताच प्रभागनिहाय संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी नगरसेविका वैशाली सुधीर अहिवळे यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आले असून, त्यांच्या उमेदवारीची शक्यता प्रबळ मानली जात आहे. दोन पिढ्यांचा राजकीय वारसा आणि स्वतःच्या कार्याचा ठसा यामुळे त्या एक मजबूत उमेदवार म्हणून समोर येत आहेत.
वैशाली अहिवळे यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. त्यांचे सासरे, कैलासवासी तानाजीराव अहिवळे यांनी फलटण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर त्यांच्या थोरल्या जाऊबाई, श्रीमती स्वाती आशिष अहिवळे यांनीही याच पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे अहिवळे कुटुंबाने जनतेचा विश्वास आणि राजकीय अनुभव दोन्ही जपले आहेत.
यावेळच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कार्यक्षम आणि लोकांमध्ये जनाधार असलेल्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वीकारल्याचे बोलले जात आहे. या निकषानुसार, वैशाली अहिवळे यांचे नाव प्रभाग क्रमांक २ साठी अत्यंत योग्य मानले जात असून, त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे.
वैशाली अहिवळे यांचे पती सुधीर अहिवळे हे स्वतः एक परिचित सामाजिक कार्यकर्ते आहेत. शहरातील अनेक सामाजिक उपक्रम, गरजू कुटुंबांना मदत आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्यामुळे निर्माण झालेला जनसंपर्क वैशाली अहिवळे यांच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरत आहे.
माजी नगरसेविका म्हणून काम करताना वैशाली अहिवळे यांनी प्रभागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि महिलांचे प्रश्न यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे महिला मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यांचे थोरले दीर, कैलासवासी आशिष अहिवळे यांचे युवक संघटनेतील कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रेरित झालेले अनेक कार्यकर्ते आजही अहिवळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
एकंदरीत, राजकीय वारसा, स्वतःच्या कामाचा अनुभव आणि सामाजिक कार्याची जोड यांमुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये वैशाली अहिवळे एक अत्यंत प्रभावी उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत अत्यंत चुरशीची होणार असली तरी, सध्या तरी सर्वांच्या नजरा वैशाली अहिवळे यांच्या उमेदवारीकडे लागल्या आहेत.