विद्यमान आमदारांना तुमच्या समाजाची गल्ली सुद्धा माहित नाही : श्रीमंत रामराजे


फलटणमधील दहशतवाद संपवण्यासाठी विद्यमान आमदारांना घरी बसवण्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे आवाहन. मंगळवार पेठेतील सभेत विरोधकांचा घेतला खरपूस समाचार.

स्थैर्य, फलटण, दि. 17 डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ मंगळवार पेठ (माता भिमाई नगर) येथे आयोजित सभेत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी धनुष्यबाणाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.

माता भिमाई नगर येथे आयोजित कोपरा सभेत बोलताना रामराजे यांनी विरोधकांवर (माजी खासदार रणजितसिंह आणि भाजप उमेदवार समशेरसिंह) नाव न घेता निशाणा साधला. विरोधकांचा उल्लेख ‘मोठे चतुर’, ‘कुटिल’ (Crooked), ‘विघ्नसंतोषी’ आणि ‘मनोरुग्ण’ असा करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

“तुम्हाला जर सुखाने राहायचे असेल, तर या दहशतवाद्यांना घालवण्याशिवाय पर्याय नाही,” असे सांगत त्यांनी फलटणमधील कथित दहशतीसाठी विरोधकांना जबाबदार धरले.

‘गल्लीही माहीत नसलेला आमदार’

विद्यमान आमदार सचिन पाटील यांचे नाव न घेता रामराजे म्हणाले,

“आता जे आमदार आहेत, त्यांना तुमच्या समाजाची गल्ली तरी माहीत आहे का? तुमच्या समाजाचा माणूस कधी त्यांच्याकडे गेला आहे का?” मी स्वतः अनेकदा तुमच्या पेठेत आलो असून तुमच्या सुख-दुःखात सहभागी झालो आहे, असे सांगत त्यांनी स्थानिक संपर्काचा दाखला दिला.

एका भावानंतर आता दुसऱ्याची वेळ

लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत रामराजे यांनी मतदारांना आवाहन केले. “एका भावाला (माजी खासदाराला) आपण घरी बसवले आहे, आता दुसऱ्या भावालाही (आमदाराला) घरी पाठवण्याची हीच वेळ आहे,” असे ते म्हणाले.

प्रचारासाठी अभिनेता गोविंदा येणार?

निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात येत्या १९ डिसेंबर रोजी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी प्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे रामराजे यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे विरोधकांची कोंडी झाली असल्याचे रामराजे म्हणाले. “विरोधकांना या योजनेला ओलांडून पुढे जाता येणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येत्या २० तारखेला होणाऱ्या मतदानात नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवारांना ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन शेवटी रामराजे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!