
स्थैर्य, फलटण, दि. 11 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. पक्षाच्या प्रदेश कमिटीकडून त्याबाबत स्पष्ट सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाल्याचे समजते. या निर्णयामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी किंवा तडजोडीची भूमिका घेतली होती. मात्र, यावेळी पक्ष स्वबळावर लढल्यास शहरातील राजे गट आणि खासदार गट यांच्यातील पारंपरिक लढतीला नवा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. या भूमिकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष ही निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी पक्ष बांधणीसाठी आणि संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीसाठी अंतर्गत बैठका सुरू केल्याचे बोलले जात आहे.
याबाबत ‘स्थैर्य’ने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, “आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल, त्याचे आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत. पक्षाच्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे उभे राहू.”
“पक्षाने आदेश दिल्यास, आम्ही फलटण नगरपरिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्यास तयार आहोत. आमची संघटनात्मक बांधणी मजबूत असून, सर्व प्रभागात उमेदवार देण्याची आमची तयारी आहे,” असा विश्वासही महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे अनेक प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे दोन्ही प्रमुख गटांना बंडखोरी रोखण्यासोबतच काँग्रेसच्या उमेदवाराचे आव्हानही पेलावे लागणार आहे.
आता पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसच्या स्वबळाच्या तयारीने नगरपरिषद निवडणुकीतील चुरस आणखी वाढवली आहे हे निश्चित.

