
फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. ४८ केंद्रांवर उद्या मतदान. महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त. वाचा सविस्तर आकडेवारी.
स्थैर्य, फलटण, दि. 19 डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, १३ प्रभागांतील ४८ मतदान केंद्रांवर एकूण ४५,५१४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निखिल जाधव यांनी ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली असून निवडणूक प्रक्रियेसाठी ५५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
नेमके नियोजन कसे?
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (दि. २०) होणाऱ्या मतदानासाठी ४८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या शून्य आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण ५५० कर्मचारी आणि ६५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कर्मचारी आज दुपारी १२ वाजता आपल्या केंद्रावर रवाना होतील.
महिला मतदारांचा वरचष्मा
फलटण शहरात एकूण ४५,५१४ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २२,२९१ असून महिला मतदारांची संख्या २३,२१७ इतकी आहे. म्हणजेच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने निकालात महिलांचा कौल निर्णायक ठरणार आहे.
ईव्हीएम आणि साधनसामग्री
प्रत्येक मतदान केंद्रावर १ कंट्रोल युनिट (CU) आणि २ बॅलेट युनिट (BU) अशी रचना असणार आहे. यासाठी एकूण ४८ कंट्रोल युनिट आणि ९६ बॅलेट युनिट वापरले जातील. तसेच राखीव म्हणून १० कंट्रोल युनिट आणि २० बॅलेट युनिट ठेवण्यात आले आहेत. ने-आण करण्यासाठी ३८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी आणि निकाल
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण १३ टेबल लावण्यात येणार असून ५ फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होईल. यासाठी ७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

