
फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी ७०.२९ टक्के मतदान. सायंकाळी ५.३० पर्यंत ३१,९९० मतदारांनी बजावला हक्क. महिला मतदारांचा पुरुषांपेक्षा जास्त टक्का.
स्थैर्य, फलटण, दि. २० डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात एकूण ७०.२९ टक्के मतदान झाले असून, ३१ हजार ९९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे, मतदानाच्या आकडेवारीत महिलांनी पुरुषांवर मात करत आघाडी घेतली आहे.
सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारनंतर चांगलाच वेग घेतला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ७.२७ टक्के मतदान झाले होते, मात्र त्यानंतर मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ५२.०२ वर पोहोचला होता आणि अंतिम टप्प्यात (सायंकाळी ५.३० पर्यंत) तो ७०.२९ टक्क्यांवर स्थिरावला.
महिलांचा टक्का वाढला
या निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ३१,९९० मतदानापैकी १६,१२९ महिलांनी मतदान केले, तर १५,८५९ पुरुषांनी मतदान केले. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे.
वेळेनुसार वाढलेली मतदानाची टक्केवारी:
शहरात एकूण ४५,५१४ मतदार असून त्यापैकी ३१,९९० जणांनी मतदान केले. यामध्ये २ इतर (Other) मतदारांचाही समावेश आहे. आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून, उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
