फलटण नगरपालिका निवडणूक 2016 फ्लॅशबॅक; शहरातील अनेक प्रभागांत रंगल्या होत्या लक्षवेधी लढती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 12 मार्च 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने शहराची नूतन प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरुन या निवडणूकांबाबत अद्याप संदिग्धता असली तरी प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे शहरात राजकीय चर्चांना जोर चढला आहे. नवीन प्रारुपानुसार गत निवडणूकीच्या तुलनेत यंदा शहरात एका प्रभागाची व दोन नगरसेवकांची वाढ झाल्याचे दिसून येत असून आरक्षणनिहाय अंतिम प्रभागरचना जाहीर होईपर्यंत उमेदवारांना आपली दावेदारी स्पष्ट करण्याकरिता वाट पहावी लागणार आहे. या परिस्थितीत गत सन 2016 सालच्या पालिकेच्या निवडणूकीतील घडामोडी डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांसह नेते मंडळींनी आपल्या हालचाली सुरु ठेवल्याचे बोलले जात आहे.

पालिकेच्या गत पंचवार्षिक निवडणूकीत विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. 25 पैकी 17 जागा जिंकण्यात राष्ट्रवादीला यश आले होते. तर तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व विद्यमान भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रीय काँग्रेससह शहरातील काही प्रभागांमध्ये शिवसेना, भाजप व अन्य पक्ष तसेच अपक्षांनी मिळवलेली मते निर्णायक ठरली होती.

गत निवडणूकीत जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्याची संधी फलटणकरांना मिळाली होती. यासाठी 28 हजार 777 वैध मतदान झाले होते. त्यामध्ये 15 हजार 448 मते मिळवून राष्ट्रवादीच्या सौ.निता नेवसे विजयी झाल्या होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ.सुवर्णा पवार यांना 10 हजार 112 मते मिळाली होती. तर अन्य उमेदवारांमध्ये मोहिनी हेंद्रे यांना 2 हजार 45, रुक्मीनी मंजुळेकर यांना 563, शोभा मोहिते यांना 236 मते मिळाली होती.

शहरातील सोमवार पेठ व परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये 1 हजार 981 वैध मतदान झाले होते. त्यामध्ये राजे गटाच्या मनिषा घोलप यांना 1 हजार 518 इतकी विजयी मते मिळाली तर शशिकला घोलप यांना 254, बाळुबाई भोसले यांना 181 मते मिळाली होती.

तर प्रभाग क्रमांक 1 ब मधून राष्ट्रवादीचे विक्रम जाधव हे बिनविरोध विजयी झाले होते.

शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ व परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये 2 हजार 370 वैध मतदान झाले होते. यामध्ये राष्ट्रवादीच्या वैशाली अहिवळे या 1 हजार 62 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. मिना काकडे यांना 474, प्रियंका अहिवळे यांना 433, सोनिया बिराडे यांना 234 मते, सरोजीनी अहिवळे यांना 142 मिळाली होती.

प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये 2 हजार 370 वैध मतदानापैकी 1 हजार 195 मते मिळवत राष्ट्रवादीचे सनी अहिवळे विजयी झाले होते. हरीश काकडे यांना 394 मते, शामराव अहिवळे यांना 324, सुरज कदम यांना 255, शितल अहिवळे यांना 174 मते मिळाली होती.

शहरातील मंगळवार पेठ, मलठण परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये 2 हजार 567 वैध मतदानापैकी 1 हजार 198 मते मिळवून राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर सचिन अहिवळे विजयी झाले होते. 1 हजार मते मिळवत पुनम भोसले यांनी त्यांना चांगली लढत दिली होती तर रोहित इंगळे यांना 286, सतीश इंगळे यांना 53 मते मिळाली होती.

प्रभाग क्रमांक 3 ब मध्ये 2 हजार 567 वैध मतदान झाले होते. दोन उमेदवारांमध्ये झालेल्या सरळ लढतीत राष्ट्रीय काँग्रेसच्या मंगलादेवी नाईक निंबाळकर 1 हजार 293 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. तर छाया जाधव यांना 1213 मते मिळाल्याने त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता.

शहरातील मलठण व परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये 1 हजार 722 वैध मतदान झाले होते. त्यामधील 786 मते मिळवत राष्ट्रीय काँग्रेसच्या मीना नेवसे विजयी झाल्या होत्या. निर्मला राऊत यांना 513, हिराबाई पवार यांना 317 तर शोभा घाडगे यांना 79 मते मिळाली होती.

प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये 1 हजार 722 वैध मतदानापैकी राष्ट्रीय काँग्रेसचे अशोक जाधव यांना 845 विजयी मते मिळाली होती. दिपक कुंभार यांनी 783 मते घेवून त्यांना चांगली लढत दिली होती. संदिपकुमार जाधव यांना 63 मते मिळाली होती.

शहरातील मलठण व परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये 2 हजार 749 वैध मतदान झाले होते. त्यामधील 1 हजार 660 मते मिळवून राष्ट्रीय काँग्रेसच्या मदलसा कुंभार विजयी झाल्या होत्या. जुईली थोरात यांना 955 मते तर सविता कुंभार यांना 100 मते मिळाली होती.

शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये 2 हजार 749 वैध मतदानापैकी तब्बल 1 हजार 576 मते मिळवत राष्ट्रीय काँग्रेसचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय नोंदवला होता. पांडुरंग गुंजवटे यांना 1 हजार 43 तर नाना जाधव यांना 82 मते मिळाली होती.

शहरातील शंकर मार्केट, शुक्रवार पेठ परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये 2 हजार 415 वैध मतदान झाले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रगती कापसे 1 हजार 269 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. विरोधी उमेदवार कविता आंबोले यांना 759, सुप्रिया जेबले यांना 263 तर संगिता कापसे यांना 87 मते मिळाली होती.

प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये 2 हजार 415 वैध मतदान झाले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे किशोरसिंह नाईक निंबाळकर 1 हजार 66 मते घेवून विजयी झाले होते. विरोधी उमेदवार अनिल जाधव यांना 841 मते, मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना 245 मते, राजेंद्र काळे यांना 206 मते, पोपट उर्फ राहूल बर्गे यांना 34 मते मिळाली होती.

शहरातील उमाजी नाईक, रविवार पेठ, मेटकरी गल्ली परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये लक्षणीय लढत झाली होती. 2 हजार 840 वैध मतदानापैकी 1 हजार 251 मते घेवून राष्ट्रवादीचे असिफ मेटकरी विजयी झाली होते. त्यांना 1 हजार 177 मते मिळवत मेहबूब मेटकरी यांनी जोरदार लढत दिली होती. तर विक्रम पवार यांना 366 मते मिळाली होती.

प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये 2 हजार 840 वैध मतांपैकी 1 हजार 296 मते घेवून राष्ट्रीय काँग्रेसच्या रश्मी नाईक निंबाळकर विजयी झाल्या होत्या. ज्योस्ना भोईटे यांना 1 हजार 233 मते मिळवत केवळ 63 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. उषा राऊत यांंना 251 मते मिळाली होती.

शहरातील एस.टी.स्टँड, घडसोली मैदान, लक्ष्मीनगर परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 8 मध्ये एकतर्फी लढतीचे चित्र पहायला मिळाले होते. प्रभाग क्र. 8 अ मध्ये 2 हजार 369 वैध मतदान झाले होते. त्यामधील तब्बल 1 हजार 446 मते मिळवत राष्ट्रवादीच्या ज्योत्स्ना शिरतोडे विजयी झाल्या होत्या. विरोधी उमेदवार मनिषा काळे यांना 563 तर विमल भुजबळ यांना 317 मते मिळाली होती.

प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये 2 हजार 369 वैध मतांपैकी 1 हजार 693 मते घेवून राष्ट्रवादीचे नंदकुमार भोईटे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. विरोधी उमेदवार नाना उर्फ मानाजी चव्हाण यांना 339, सनी कदम यांना 245 तर सम्राट गायकवाड यांना 38 मते मिळाली होती.

शहरातील गजानन चौक, अहिल्यादेवी नगर, नारळी बाग, लक्ष्मीनगर परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मध्येही एकतर्फी लढतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व पहायला मिळाले होते. प्रभाग क्र.9 अ मध्ये 2 हजार 542 वैध मतांपैकी 1 हजार 741 मते घेवून वैशाली चोरमले विजयी झाल्या होत्या. विरोधी उमेदवार पूनम पवार यांना 415, अश्विनी राऊत यांना 344 मते मिळाली होती.

तर प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये 2 हजार 542 वैध मतांपैकी तब्बल 1 हजार 773 इतकी सर्वाधिक मते घेत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर विजयी झाले होते. विरोधी उमेदवार युवराज पवार यांना 443, रविंद्र फडतरे यांना 229 तर संतोष बिचुकले यांना 54 मते मिळाली होती.

शहरातील बुधवार पेठ, शिवाजी रोड, दगडी पुल परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये 2 हजार 546 वैध मतांपैकी 934 मते मिळवत राष्ट्रवादीचे अजय माळवे विजयी झाले होते. विरोधी उमेदवार दिपक शिंदे यांना 673, श्रीकांत पालकर यांना 465, विकास राऊत यांना 201, अरुण जाधव यांना 174 , रामविलास रणसिंग यांना 72 मते मिळाली होती.

प्रभाग क्रमांक 10 ब मध्ये 2 हजार 546 वैध मतांपैकी राष्ट्रवादीच्या सुवर्णा खानविलकर यांना 1 हजार 435 विजयी मते मिळाली होती. विरोधी उमेदवार मुक्ति शहा यांना 724, शुभांगी रासकर यांना 250 तर सुशिला जाधव यांना 81 मते मिळाली होती.

शहरातील दत्तनगर, स्वामी विवेकानंद नगर, भडकमकर नगर परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 11 अ मधील लढतही लक्षवेधी ठरली होती. 2 हजार 58 वैध मतांपैकी 757 मते मिळवत राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्योती खरात यांनी विजय मिळवला. तर किशोर उर्फ गुड्डू पवार यांना 743 मते मिळाल्याने केवळ 14 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. अन्य उमेदवार घनश्याम सरगर यांना 428, नयना भगत यांना 101, चंद्रकांत साळवी यांना 1 मत मिळाले होते.

प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये 2 हजार 58 वैध मतदानापैकी 929 मते मिळवत अ‍ॅड.मधुबाला भोसले विजयी झाल्या होत्या. विरोधी उमेदवार रेणुका पवार यांना 507, हेमा मठपती यांना 450 तर शैलजा फडतरे यांना 139 मते मिळाली.

शहरातील संजीवराजे नगर, विद्या नगर, गोळीबार मैदान परिसराचा समावेश असणार्‍या प्रभाग क्रमांक 12 अ मध्ये 2 हजार 618 वैध मतांपैकी 1 हजार 231 मते मिळवत राष्ट्रवादीचे जगन्नाथ कुंभार विजयी झाले होते. विरोधी उमेदवार अमीर शेख यांना 1 हजार 52, श्रीपाद हेंद्र यांना 261, सम्राट गायकवाड यांना 33 मते मिळाली होती. दरम्यान, जगन्नाथ कुंभार यांच्या अकस्मित निधनानंतर त्यांच्या जागी श्रीमती रंजना जगन्नाथ कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.

प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये झालेल्या सरळ लढतीत 2 हजार 618 वैध मतांपैकी 1 हजार 472 मते मिळवत राष्ट्रवादीच्या श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर विजयी झाल्या होत्या. त्यांना माधुरी महामुलकर यांनी 1 हजार 16 मते घेत चांगली लढत दिली होती.

प्रभाग क्रमांक 12 क मध्ये झालेल्या अतितटीच्या लढतीत 2 हजार 618 वैध मतदानातील 1 हजार 105 मिळवत राष्ट्रवादीच्या दिपाली निंबाळकर विजयी झाल्या होत्या. ज्योती बेडके यांना 1 हजार 27 मते मिळाल्याने केवळ 78 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. अन्य उमेदवार विजया कदम यांनी 443 मते मिळवली होती.

दरम्यान, फलटण तालुक्याच्या राजकीय परिस्थितीत गत 5 वर्षामध्ये मोठी उलथा-पालथ झाली असल्याने यंदाचा पालिकेच्या निवडणूकीचा आखाडा आणखीनच रंजक ठरणार आहे. रणनिती ठरवताना गत निवडणूकीतील मतांची आकडेवारी महत्त्वपूर्ण आहेच. शिवाय प्रभाग रचनेत झालेले बदल व आरक्षण याबरोबरच प्रभागात उमेदवारांनी केलेली विकासकामे, रखडलेली कामे, नागरिकांची नाराजी, इच्छुकांची वाढती संख्या या सगळ्याचा ताळमेळ जुळवून प्रमुख नेतेमंडळी उमेदवारी देताना जुन्यांनाच ‘वन्स मोअर’ की नवीन चेहर्‍यांना ‘चान्स’ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!