
शासकीय घोषणेची केवळ औपचारिकता बाकी; दोन दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता
स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचनाच अंतिम प्रभाग रचना म्हणून कायम करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. या प्रारूप रचनेवर दाखल करण्यात आलेल्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या असून, मूळ आराखड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. विविध राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांनी यावर आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. या सर्व हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही हरकत न स्वीकारता प्रारूप आराखडाच अंतिम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
याबाबत अद्याप कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित झालेले नाही. तथापि, येत्या दोन दिवसांत ही अंतिम प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रभाग रचनेत बदल होण्याची अपेक्षा असलेल्या इच्छुकांचा यामुळे हिरमोड झाला असून, आता राजकीय पक्षांना उमेदवार निश्चितीच्या आणि रणनीतीच्या कामाला वेग द्यावा लागणार आहे.