फलटण नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्गजांचे धाबे दणाणले, राजकीय समीकरणे बदलली

एकाही दिग्गजाला हक्काचा प्रभाग नाही, लढत थेट सत्ताधारी विरुद्ध विरोधक होण्याची शक्यता


स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी, दि. १८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या नवीन रचनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली असून, अनेक प्रस्थापित आणि दिग्गज नगरसेवकांचे राजकीय गड-किल्ले ढासळल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहीर झालेल्या प्रारूप रचनेनुसार, प्रभागांची तोडफोड अशा प्रकारे करण्यात आली आहे की, कोणताही विद्यमान किंवा माजी नगरसेवक “हा प्रभाग माझाच आहे” असा दावा करू शकत नाही. अनेक माजी नगरसेवकांचे पूर्वीचे मतदारसंघ तीन ते चार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत, त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. हक्काचा मतदारसंघच विभागला गेल्याने आता निवडणूक लढवायची कोठून, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रभाग रचनेतील या बदलांमुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अनेक नेत्यांनी आतापासूनच नव्या प्रभागांमध्ये मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आपला जुना प्रभाग गेला असला तरी, नवीन प्रभागात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या प्रभाग रचनेमुळे आगामी निवडणूक ही प्रामुख्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात थेट होण्याची शक्यता आहे. प्रभागांची रचना पाहता, तिसरी आघाडी किंवा मोठी बंडखोरी होण्याची शक्यता कमी झाली आहे, ज्यामुळे लढती अधिक चुरशीच्या होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!