
फलटण नगरपरिषदेचा सन २०२६-२७ चा तब्बल ३५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १७ मार्च : फलटण नगरपरिषदेची अत्यंत महत्त्वाची विशेष सर्वसाधारण सभा आज लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल ३५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. शहराच्या विकासाला दिशा देणारा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असला तरी, सभागृहात रंगलेल्या राजकीय घडामोडींनी मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगराध्यक्षांच्या आदेशाने हा अर्थसंकल्प सादर केला. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर, दुपारी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये तो बहुमताने आणि सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
असा आहे फलटण नगरपरिषदेचा अर्थसंकल्प (२०२६ – २०२७)
यंदाच्या अर्थसंकल्पात महसुली जमा-खर्च आणि भांडवली जमा-खर्च या लेखाशीर्षात नवीन लेखाशीर्षके तयार करण्यात आली आहेत. त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे:
-
आरंभीची शिल्लक: ५९,३७,६०,९४४ रुपये (एकोपाणसाठ कोटी सदतीस लाख साठ हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये)
-
महसुली जमा: ५०,५८,२८,५०० रुपये (पन्नास कोटी अठ्ठावन्न लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये)
-
भांडवली जमा: २४१,७३,३०,००० रुपये (दोनशे एककेचाळीस कोटी त्र्याहत्तर लाख तीस हजार रुपये)
-
प्रारंभी शिल्लकेसह एकूण जमा: ३५१,६९,१९,४४४ रुपये (तीनशे एकावन्न कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये)
-
महसुली खर्च: ५६,८०,९२,४८० रुपये (छप्पन्न कोटी ऐंशी लाख ब्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये)
-
भांडवली खर्च: २,९४,८३,००,००० रुपये (दोनशे चौऱ्याण्णव कोटी त्र्याऐंशी लाख रुपये)
-
एकूण खर्च: ३५१,६३,९२,४८० रुपये (तीनशे एकावन्न कोटी त्रेसष्ठ लाख ब्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये)
-
अखेरची शिल्लक: ५,२६,९६४ रुपये (पाच लाख सव्वीस हजार नऊशे चौसष्ठ रुपये)
अनिकेतराजेंना ‘बॅक-बेंच’ आणि गटनेत्यांची दांडी
आजच्या या सभेतील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला तो बैठक व्यवस्था. गत दोन सभांना गैरहजर असलेले विरोधी गटाचे स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आजच्या सभेला आवर्जून उपस्थित होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीच्या दिवशीच विरोधी शिवसेना गटाचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष पांडुरंग (आबा) गुंजवटे यांनी अनुपस्थिती प्रकर्षाने दर्शवली.
आजच्या सभेत प्रत्येक विषय समितीचे सभापती व नगरसेवकांच्या खुर्च्यांसमोर त्यांची नावे टाकून बैठकीची जागा आरक्षित करण्यात आली होती. यामध्ये गैरहजर असलेले पांडुरंग गुंजवटे यांची जागा पहिल्या रांगेत होती, तर श्रीमंत अनिकेतराजे यांची जागा थेट मागील बाकावर (बॅक-बेंच) देण्यात आली होती. या प्रकारामुळे शिवसेना गटातील काही नगरसेवकांनी थेट नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली व अनिकेतराजे यांची बैठक व्यवस्था पुढे पहिल्या रांगेत करण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रकारामुळे नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती.
सभेत रंगलेली चर्चा आणि प्रश्नोत्तरे
-
निधी वाढवण्याची मागणी: आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी या अर्थसंकल्पाचे सूचक म्हणून काम पाहिले. या बजेटमध्ये एकूण २९ शीर्षके असून, विकासासाठी निधी कमी पडत असल्याने त्यात वाढ करण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजपा गटनेते रोहित नागटिळे यांनी यास अनुमोदन दिले.
-
सादरीकरणास उशीर का?: विरोधी नगरसेवक पंकज पवार आणि विकास अहिवळे यांनी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळेवरून प्रशासनाला धारेवर धरले. “२८ फेब्रुवारीअखेर अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक होते, परंतु आज उशीर होत आहे. हा अर्थसंकल्प जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर होऊन आला आहे की आता पुढे जाणार आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शासकीय तरतुदी स्पष्ट करत सांगितले की, सर्व गटनेत्यांशी चर्चा करूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे व तो नियमानुसारच आहे.
-
अर्थसंकल्पाचा फॉन्ट लहान: विरोधी नगरसेवक विकास काकडे यांनी अर्थसंकल्पाची छपाई अत्यंत लहान फॉन्टमध्ये (अक्षरांमध्ये) करण्यात आल्याची तक्रार केली. पुढील बैठकीत हे अहवाल मोठ्या फॉन्टमध्ये देण्याची मागणी त्यांनी केली, ज्याला अध्यक्षांनी तत्काळ मंजुरी दिली.
या विशेष सभेस सार्वजनिक बांधकाम सभापती सोमाशेठ जाधव, आरोग्य सभापती सचिन अहिवळे, नियोजन सभापती संदीप चोरमले, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. मोहिनी हेंद्रे, मागासवर्गीय समिती सभापती सौ. सुपर्णा अहिवळे उपस्थित होते.
याशिवाय स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव, भाजपा गटनेते रोहित नागटिळे, पंकज पवार, अझरुद्दीन (पप्पू) शेख, विशाल तेली, किरण राऊत यांच्यासह सौ. रुपाली सस्ते, अमित भोईटे, सौ. अस्मिता लोंढे, सुदाम (अप्पा) मांढरे, सौ. कांचन व्हटकर, सौ. मीना काकडे, सौ. स्मिता शहा, सौ. रुपाली जाधव, सौ. श्वेता तारळकर आदी नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. शेवटी हा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
