
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : ‘स्वच्छ फलटण, सुंदर फलटण, हरित फलटण’ या ध्येयाअंतर्गत फलटण नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता श्रमदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान उद्या, शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी, गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
या अभियानांतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेत सर्व नागरिक, विविध संस्था, शाळा, महाविद्यालये आणि महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी आपापल्या प्रभागात सकाळी ८ वाजता उपस्थित राहून या श्रमदानात सहभागी व्हावे आणि स्वच्छतेचा हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असेही मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी म्हटले आहे.