फलटण नगरपरिषद निवडणूक: विरोधक चाचपडत असतानाच सिद्धाली शहा यांनी पुन्हा पिंजून काढला प्रभाग क्रमांक ८!


स्थैर्य, फलटण, दि. 12 डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीतील कायदेशीर पेचामुळे आणि निवडणूक कार्यक्रम पुढे गेल्यामुळे मध्यंतरीच्या काळात प्रचाराच्या तोफा काहीशा थंडावल्या होत्या. मात्र, आता हे मळभ दूर सारत प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी पुन्हा एकदा प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. अनिश्चिततेचे वातावरण असतानाही सिद्धाली शहा यांनी पुन्हा एकदा ‘जनसंपर्क’ मोहिमेला गती दिली असून, त्यांच्या या आक्रमक प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमामुळे उमेदवारांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे प्रभागातील इतर प्रतिस्पर्धी उमेदवार आणि विरोधक अद्यापही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून ते प्रचारात थंडावलेले दिसत आहेत. मात्र, या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवत आणि एकही क्षण वाया न घालवता सिद्धाली शहा यांनी पुन्हा एकदा प्रभागात रान उठवले आहे. विरोधक अजूनही सक्रिय होण्याच्या तयारीत असतानाच सिद्धाली शहा यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धाली शहा यांची प्रचार यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली आहे. नेत्यांचे मिळणारे पाठबळ आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे प्रभाग क्र. ८ मध्ये भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर प्रचाराची रणनीती आखली आहे. निवडणूक लांबणीवर पडली तरी मतदारांशी असलेली नाळ तुटू द्यायची नाही, या उद्देशाने अनुप शहा आणि सिद्धाली शहा यांनी पुन्हा एकदा घरोघरी जाऊन संपर्कावर भर दिला आहे.

मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या या प्रचाराला मतदारांकडूनही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “निवडणूक कधीही होऊ दे, आमचे मत विकासाला आणि सिद्धाली शहा यांनाच,” अशा प्रतिक्रिया प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत. सिद्धाली शहा यांनी प्रचारात घेतलेली ही ‘लीड’ त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी ठरत आहे.

एकंदरीत, कायदेशीर लढाई आणि तारखांचा घोळ सुरू असतानाच, मैदानातील लढाईत मात्र सिद्धाली अनुप शहा यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. विरोधक जागे होईपर्यंत सिद्धाली शहा यांनी मतदारांच्या मनात आपले स्थान पुन्हा एकदा पक्के केले आहे, हे त्यांच्या सध्याच्या झंझावाती प्रचारावरून स्पष्ट होत आहे.


Back to top button
Don`t copy text!