
फलटण नगरपरिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश काढले असून २० डिसेंबरला मतदान तर २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. वाचा सविस्तर वेळापत्रक.
स्थैर्य, सातारा, दि. 05 डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा सुधारित कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी बुधवारी (दि. ४) जाहीर केला. न्यायालयाचे आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, आता फलटण नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
सुधारित निवडणूक कार्यक्रम असा
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, निवडणूक प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे असतील:
-
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत: १० डिसेंबर २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत).
-
चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी: ११ डिसेंबर २०२५.
-
मतदान (आवश्यक असल्यास): २० डिसेंबर २०२५ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत).
-
मतमोजणी: २१ डिसेंबर २०२५ (सकाळी १० वाजल्यापासून).
-
निकाल प्रसिद्धी: २३ डिसेंबर २०२५ पूर्वी.
मतमोजणीचे ठिकाण निश्चित
निवडणुकीची मतमोजणी फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळील ‘शासकीय धान्य गोदाम’ येथे होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर काम पाहणार आहेत, तर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी निखिल जाधव आणि तहसीलदार अभिजित जाधव हे सहकार्य करतील.
न्यायालयीन आदेशामुळे बदल
राज्य निवडणूक आयोगाचे २९ नोव्हेंबर २०२५ चे आदेश आणि न्यायालयात दाखल झालेल्या अपिलावरील (दि. २९.११.२०२५) आदेशातील मुद्दा क्रमांक १ व २ नुसार हा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १ ते १३ प्रभागांतील सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक यानुसार पार पडणार आहे.

