
स्थैर्य, फलटण, दि. ६ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदांची आरक्षण सोडत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागे असणाऱ्या नगरपरिषदेच्या सभागृहात (BSNL ऑफिसच्या शेजारी) तळमजल्यावर हा सोडत कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी एका जाहीर सूचनेद्वारे दिली आहे.
या सोडतीमध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
आरक्षण सोडतीनंतर प्रारुप आरक्षणाची प्रसिद्धी गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी केली जाईल. या प्रारुप आरक्षणावर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हरकती व सूचना फलटण नगरपरिषद कार्यालयात स्वीकारल्या जातील. ज्या नागरिकांच्या हरकती व सूचनांवर सुनावणी आवश्यक असेल, त्यांना स्वतंत्रपणे कळवले जाईल, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.