
फलटण नगरपरिषद निवडणुका पुढे गेल्याने उमेदवारांची कसरत वाढली आहे. राजे गट आणि खासदार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून बड्या नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरू आहे. वाचा सविस्तर.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ डिसेंबर : राज्यातील काही नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने उमेदवारांचा जीव भांड्यात पडला असला, तरी आता वाढीव कालावधीत प्रचार यंत्रणा राबवताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मिळालेल्या या जादा वेळेचा फायदा घेण्यासाठी राजे गट आणि खासदार गट या दोन्ही प्रमुख गटांनी आपली रणनीती बदलली असून, आता ‘मायक्रो प्लॅनिंग’वर भर दिला जात आहे.
निवडणूक पुढे गेल्याने वाढली धाकधूक
निवडणुका पुढे गेल्यामुळे उमेदवारांना आता जवळपास वीस दिवसांचा अधिकचा कालावधी मिळाला आहे. या कालावधीत मतदारांशी संपर्क वाढवता येईल, असे वाटत असले तरी आर्थिक आणि मानसिक स्तरावर उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमुळे राजे गटातील कार्यकर्ते चार्ज झाले होते. मात्र, निवडणुका लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून कार्यकर्ते पुन्हा त्याच जोमाने कामाला लागणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजे गटाची रणनीती: कमकुवत प्रभागांवर लक्ष
राजे गटाने या वाढीव वेळेचा सदुपयोग करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. ज्या प्रभागांमध्ये राजे गट कमकुवत (Weak) आहे, त्या ठिकाणी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः लक्ष घालत आहेत. विरोधकांकडून कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाल्यास, त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या सभा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. तसेच, पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्याचा मानस राजे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे.
खासदार गटाचे ‘मायक्रो प्लॅनिंग’
दुसरीकडे, खासदार गटानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांचे सध्या सूक्ष्म नियोजन (Micro Planning) सुरू असून, उमेदवारांना प्रचार यंत्रणेसाठी त्यांनी पॅरलल यंत्रणा उभारल्याची चर्चा सुरु आहे.
बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका?
फलटण शहरात सध्या बड्या नेत्यांच्या सभांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. खासदार गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते. या नेत्यांच्या तोफा फलटणमध्ये धडाडणार असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. दोन्ही गट एकमेकांवर वरचढ ठरण्यासाठी या वाढीव वेळेचा कसा वापर करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

