फलटण नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना जाहीर, हरकती व सूचनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

नागरिकांना नगरपरिषदेत लेखी स्वरूपात नोंदवता येणार आक्षेप; स्वतंत्र सुनावणीचीही तरतूद


स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार, फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, आज, दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी दिली आहे.

नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना आजपासून नागरिकांसाठी नगरपरिषदेच्या सूचना फलकावर आणि अधिकृत वेबसाईटवर कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना असल्यास, त्या दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयातील कर विभागामध्ये लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हरकती व सूचना सादर केलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्रपणे सुनावणी आयोजित करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे, असेही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी कळवले आहे.


Back to top button
Don`t copy text!