
फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार आहे. २० डिसेंबरला मतदान असल्याने शेवटच्या १० दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या सभा होणार आहेत. वाचा सविस्तर.
स्थैर्य, फलटण, दि. 07 डिसेंबर : तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता पुन्हा वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारपासून (दि. ७) पुन्हा एकदा धडाडणार आहेत. २० डिसेंबर रोजी मतदान असल्याने हातात केवळ १० ते १२ दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आता ‘टॉप गिअर’ टाकला असून वैयक्तिक गाठीभेटींऐवजी आता थेट कोपरा सभा आणि रॅलींवर भर दिला जाणार आहे.
शेवटचे १० दिवस: कोपरा सभांवर भर
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उमेदवारांकडे आता प्रचारासाठी केवळ १० दिवस शिल्लक आहेत. मधल्या काळात निवडणुका पुढे गेल्याने अनेक उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला होता. मात्र, आता कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभागांमध्ये कोपरा सभांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक उमेदवार आपली आणि आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.
दिग्गजांच्या सभांचे नियोजन: ‘हाय व्होल्टेज’ प्रचार
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक ‘हाय व्होल्टेज’ नेते फलटणमध्ये प्रचारासाठी येणार आहेत. त्यांच्या सभांचे नियोजन सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
शिवसेनेचे मंत्रीही मैदानात उतरणार
दुसरीकडे, शिवसेनेकडूनही (शिंदे गट) जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय शिवसेनेचे विविध राज्यस्तरीय पदाधिकारीही फलटणमध्ये तळ ठोकून असणार आहेत.
वाढीव वेळेचा फायदा कुणाला?
निवडणूक तारखांमध्ये बदल झाल्यामुळे दोन्ही गटांना प्रचारासाठी अधिकचा वेळ मिळाला. या वाढीव वेळेचा आणि आता होणाऱ्या बड्या नेत्यांच्या सभांचा नेमका फायदा कोणत्या गटाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदार राजा नक्की कुणाच्या पारड्यात वजन टाकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

