
स्थैर्य, फलटण, दि. 8 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यंदा लोकनियुक्त नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असून, नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असल्याने उमेदवारीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. नक्की कोण नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत बाजी मारणार, यावर शहरात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
फलटण नगरपरिषदेच्या या निवडणुकीत प्रामुख्याने राजे गट विरुद्ध खासदार गट अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल, यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने दोन्ही गट सावध पवित्रा घेत आहेत.
राजे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर आणि बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची नावे आघाडीवर आहेत. दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी मजबूत असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल उत्साह आहे. अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, खासदार गटाकडून माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले आणि माजी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची नावे चर्चेत आहेत. दोन्ही नेते अनुभवी असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. खासदार गट कोणाला उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर अनेक नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. सक्षम आणि लोकप्रिय उमेदवार दिल्यास त्याचा फायदा प्रभागातील उमेदवारांनाही होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही गट उमेदवारी देताना सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतील, असे चित्र आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भेटीगाठी, बैठका आणि मेळावे यांचा सपाटा सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत शहरातील चौकाचौकात आणि कट्ट्यांवर कोण होणार नगराध्यक्ष, यावरच चर्चा रंगणार आहेत. नागरिकांमध्येही निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

