स्थैर्य, फलटण, दि. २० : फलटण शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सर्वत्र घबराहट निर्माण झाली आहे. शहरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये असणारे बेड्स हे कोरोना बाधितांसाठी पुरेनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व तालुक्यातील कोरोनाबाधितांसाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी १०० बेड्सचे सुसज्ज सजाई गार्डन कोव्हिडं हेल्थ केअर सेंटर सुरु केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या कोव्हिडं केअर सेंटरमध्ये २८ ऑक्सिजन बेड तर ७२ सर्वसाधारण बेड कोरोना बाधितांसाठी तयार करण्यात आले आहेत. या कोव्हिडं केअर सेंटरसाठी असलेल्या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांच्या सुमारे ५० जणांच्या टीमची जबाबदारीही भोईटे यांनी घेतलेली आहे. नंदकुमार भोईटे यांचे कार्य हे वाखणण्याजोगे आहे, असे मत विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केले.
उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी कोरोनाबाधितांना मोफत सेवा देण्याच्या उद्देशाने स्वखर्चातून उभा केलेल्या सजाई गार्डन कोव्हिडं केअर सेंटरचे लोकार्पण आज महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे चेअरमन रणधीर भोईटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अजय माळवे, सनी अहिवळे, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, ऋतुराज भोईटे व किरण भोईटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कोरोनाचे संकट हे संपुर्ण जागावर आलेले आहे. कोरोनाची पहिली लाट आल्यावर लाईफ लाईन हॅास्पीटल द्वारे कोरोना केअर सेंटर सुरू केलेले आहे. कोरोनामुळे गुंतागुंतीचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे. फिल्ड लेवलवर काम करताना बेड्स व हॅास्पाटल सुविधा निर्माण करणे हे गरजेचे आहे. सरकारवर टिका करण्याची ही वेळ नाही. नागरिकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी माझ्या पदाच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असतो. कोरोना काळात सर्वात जास्त हे डॉक्टर व शास्त्रज्ञ हे जास्त गोंधळलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांनी एकत्रितपणे काम केले तर आपण जिल्ह्यातील नागरिकांना नक्की वाचवू शकणार आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
१९८९ सालापासून समाजकारणात आणि राजकारणात दाखल झालेल्या नंदकुमार भोईटे यांनी प्रथम आरडगावचे उपसरपंचपद भूषविले आहे. तदनंतर १९९१ साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९१ सालापासून ते आजपर्यंत फलटण शहरातील व तालुक्यातील जनतेसाठी नंदकुमार भोईटे यांचा सतत लोकहिताचे उपक्रम राबविण्यात पुढाकार असतो. नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी विविध पदे भोईटे यांनी भूषविली आहेत. दरम्यान, कोरोना बाधितांना त्यांनी केलेल्या मदतीमुळे सर्व स्तरातून भोईटे यांचे अभिनंदन होत आहे. भोईटे यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे.
सध्या फलटणसह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना या आजाराचे रूग्ण झपाट्याने वाढलेले आहेत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी सध्या बेड्स उपलब्ध होत नाहीत. हे जाणूनच फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी त्यांच्या स्वमालकीच्या सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला व तातडीने कार्यवाही करून कोरोना केअर सेंटर सुरू सुध्दा करण्यात आले. ह्या कोरोना केअर सेंटरला प्रशासनाचे संपुर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी या वेळी दिली.
या वेळी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे आभार फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी मानले.