दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली शहराची नवीन प्रभाग रचना जिल्हाधिकार्यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. प्रभाग रचनेच्या नवीन शहराची 13 प्रभागांमधून विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले आहे.
फलटण शहर हे १३ प्रभागात विभागले असून नुकतीच प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी आज प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे.
नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आता बहुतांश ठिकाणी स्वतः उभे न राहता आपल्या घरातील महिलांना उभे करावे लागणार असल्याचे चित्र तयार झालेले आहे. फलटण नगरपरिषदेमध्ये २७ नगरसेवक असणार आहेत. त्यामध्ये ५ नगरसेवक हे अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. तर एकूण १४ जागा ह्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. जाहिर करण्यात आलेल्या आरक्षणावर दि. २१ जुन २०२२ पर्यंत सदरील आरक्षणावर हरकती व सूचना दाखल कराव्यात, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.
आज फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागे नव्याने उभारण्यात आलेल्या हॉलमध्ये प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केली. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच फलटण शहरातील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळस नगराध्यक्षांची निवड हि नगरसेवकांच्यामधून असल्याने शहरातील माजी माजी नगराध्यक्षांनी व उपनगराध्यक्षांनी यावेळी आपण कसे नगराध्यक्ष होवू या साठी कंबर कसली आहे. त्यामुळे झालेल्या आरक्षण सोडतीवर माजींचे भावी वाटचाल ठरत आहे. आपण स्वतः नाहीतर तर पद आपल्या घरातच कसे यावे यासाठी सुद्धा सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील इच्छुकांच्या हालचाली सुरु आहेत.
आता होणारी नगरपरिषद निवडणूक हि अतिशय चुरशीची होणार आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. त्यासोबतच गत ३० वर्षे नगरपरिषदेमध्ये सत्ता ताब्यात ठेवण्यामध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना यश आलेले आहे. यापुढे तालुक्याची सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर नगरपरिषदेमध्ये आपली निर्विवाद सत्ता मिळवणे गरजेचे आहे.
यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राज्यासह देशातील राजकारणामध्ये चांगलेच सक्रिय आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर थेट बारामतीकडे वळवलेले पाणी त्यांनी फलटणसह माळशिरस व सांगोला तालुक्याकडे वळवून थेट बारामतीकरांना आवाहन दिले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर भारतीय जनता पार्टीकडून सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी राज्यामधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुद्धा करण्यात आलेली होती. त्यामुळे आगामी काळामध्ये जर राज्यमध्ये व देशामध्ये राजकारण करत असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावून दाखवावा लागणार आहे.
– शहराची स्थळ दर्शक खुणांसह प्रभाग रचना व जाहीर करण्यात आलेले आरक्षण –
प्रभाग क्रमांक 1 (अ, ब) – श्रीराम सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, नगर परिषद वॉटर वर्क्स, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, फिरंगाई मंदिर.
आरक्षण –
(अ) – अनुसूचित जाती – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 2 (अ, ब) – बुद्धविहार, रानडे पेट्रोल पंप, बँक ऑफ बडोदा, मटण मार्केट, पेठ मंगळवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह.
आरक्षण –
(अ) – अनुसूचित जाती – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 3 (अ, ब) – कुरेशी मस्जिद, जैनमंदिर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर, स्मशान भूमी.
आरक्षण –
(अ) – अनुसूचित जाती
(ब) – सर्वसाधारण खुला – महिला
प्रभाग क्रमांक 4 (अ, ब) – हरिबुवा मंदिर, महादेव मंदिर, गणेश नगर, फलटण इंडस्ट्रीज जुनी इमारत, निमकर सिड्स, बॅरीस्टर राजाभाऊ भोसले बंगला, महाराजा हॉटेल, बोरावके शोरुम.
आरक्षण –
(अ) – अनुसूचित जाती – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 5 (अ, ब) – श्रीकृष्ण बेकरी, संतोषी माता मंदिर, काळुबाई मंदिर, गणपती मंदिर.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 6 (अ, ब) – बुधवार पेठ, लाटकर तट्टी, ईदगाह तळे, दफन भुमी, खंडोबा मंदिर.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 7 (अ, ब) – पाचबत्ती चौक, बादशाही मस्जिद, फलटण गेस्ट हाऊस, हत्तीखाना, टाळकुटे मंदिर, श्रीराम पोलीस चौकी, कुंभार टेक.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 8 (अ, ब) – फलटण नगरपरिषद इमारत, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एस.टी.स्टँड, श्रीराम हायस्कूल, व्होरा बेबी केअर सेंटर, स्पंदन हॉस्पिटल.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 9 (अ, ब) – फलटण लाईफ लाईन हॉस्पिटल, कॅनरा बँक, नारळी बाग, संत ज्ञानेश्वर मंदिर, विश्राम गृह, माळजाई मंदिर, मुधोजी हायस्कूल.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 10 (अ, ब) – दगडी पूल, हनुमान मंदिर, श्रक्षराम मंदिर, जैन मंदिर, नवलबाई कार्यालय, महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 11 (अ, ब) – रंगशिळा मंदिर, आबाासहेब मंदिर, ग्रामीण पोलीस स्टेशन, मुधोजी कॉलेज, हरीनारायण टेकडी मंदिर, बाहुबली जिनींग फॅक्टरी.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक 12 (अ, ब) – तहसिल व प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय, पद्मावती नगर, श्रीखंडे मळा, भडकमकर नगर, पोलीस स्टेशन, मध्यवर्ती इमारत.
आरक्षण –
(अ) – अनुसूचित जाती
(ब) – सर्वसाधारण खुला – महिला
प्रभाग क्रमांक 13 (अ, ब, क) – गोळीबार मैदान, विद्यानगर, संजीवराजे नगर, हाडको कॉलनी, लक्ष्मी विलास व्हिला.
आरक्षण –
(अ) – सर्वसाधारण खुला – महिला
(ब) – सर्वसाधारण खुला – महिला
(क) – सर्वसाधारण खुला