फलटण नगराध्यक्षपद: लढत जवळपास निश्चित! श्रीमंत अनिकेतराजे विरुद्ध समशेरसिंह यांच्यातच होणार थेट सामना


स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि. १७) शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असताना, नगराध्यक्षपदाच्या लढतीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. सर्व राजकीय चिन्हे पाहता, ही लढत राजे गट विरुद्ध खासदार गट अशीच होणार असून, यात थेट सामना युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच होणार असल्याची दाट शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजे गटाच्या भूमिकेबाबत आणि चिन्हाबाबत असलेला संभ्रम आता संपल्यात जमा आहे. ‘स्थैर्य’ने यापूर्वीच वर्तवलेल्या शक्यतेनुसार, राजे गट हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. राजे गटाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

दुसरीकडे, महायुतीने (खासदार गट) सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. या गटाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ या चिन्हावर लढवली जाणार हे स्पष्ट झाले आहे. खासदार गटाकडून माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर असून, त्यांचीच उमेदवारी निश्चित समजली जात आहे. समशेरसिंह यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचाराचा धडाका लावत जनसंपर्क वाढवला आहे.

आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही गटांकडून या दोन्ही उमेदवारांचे अधिकृत ‘एबी फॉर्म’सह अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलटणच्या इतिहासातील ही सर्वात प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी लढत पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. दोन्ही उमेदवार नाईक निंबाळकर कुटुंबातीलच असल्याने ही ‘रॉयल फाईट’ ठरणार आहे.

राजे गटासाठी ही निवडणूक ३० वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी ‘अस्तित्वाची लढाई’ बनली आहे. गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी आणि पुन्हा एकदा गड राखण्यासाठी श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखाली गट पूर्ण ताकदीने उतरणार आहे. तर, दुसरीकडे शहरात ‘बदल’ घडवण्यासाठी महायुतीने समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने तगडे आव्हान उभे केले आहे.

सध्या तरी या दोन नावांचीच नगराध्यक्षपदासाठी प्रमुख चर्चा असून, आज दुपारपर्यंत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. मात्र, सर्व राजकीय समीकरणे पाहता फलटणकरांना श्रीमंत अनिकेतराजे विरुद्ध समशेरसिंह असाच थेट सामना पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!