दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्री गणेश हिंदू धर्मियांसाठी आद्यदेवता ‘श्री गणेश’ हा माता पार्वतीच्या मळापासून तयार झाला. ज्ञानांचा राजा ज्ञानेश्वर यांनीही ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचे वर्णन केले आहे. गणेश ही विद्येची देवता आहे. अबालवृद्धांना प्रिय असलेला गणेशोत्सव यावर्षी शनिवार, दि. ७ सप्टेंबर ते मंगळवार, दि. १७ सप्टेंबर २०२४ अखेर महाराष्ट्रासह देशात व परदेशातही साजरा केला जाईल.
फलटणच्या बाजारपेठेत फेरफटका मारला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीक असलेल्या फळबाजाराचे बाजूस व सावकर गल्ली परिसरात, जुनी मंडई परिसरातील दुकाने श्री गणेशाच्या आरासा करण्यासाठी आवश्यक असलेली मखरे, फोमची कमान, गोल मण्यांच्या, प्लॅस्टिकच्या विविध रंगी फुलांच्या माळा तसेच कागदी फुलांच्या माळा, एल.ई.डी. दिव्यांच्या माळा आदी साहित्यांनी गजबजली आहेत. ग्राहकांकडून सजावटीसाठी कार्डशीट, वेलवेट पेपर, गोल्डन पेपर तसेच कापडी साहित्याची मागणी होत आहे. आकर्षक पडदे, रंगीबेरंगी झालर, सुशोभीकरणासाठी पाना फुलांच्या कमानी, मण्यांच्या काचेच्या नळ्या, शंख शिपल्यांच्या माळा त्याचप्रमाणे विविध प्रकारचे मुगुट, जास्वंदीच्या नकली फुलांच्या माळा याची रेलचेल आहे. सायंकाळी विविध प्रकारच्या माळा लावून विक्रेत्यांकडून ग्राहकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे. श्रीराम बझारमध्ये सजावटीचे सर्व साहित्य असून पेणचे गणपती ग्राहकांनी पूर्ण पैसे भरून बुकिंग केले आहेत. मुख्य प्रवेश द्वारानजीक फोल्डींग स्टँड ६ बाय ६ बाय ७ असलेले तसेच ६ बाय ६ बाय ७ या मापाचे आकर्षक पडदे ग्राहकांना भुरळ घालत आहेत.
सणाचे औचित्य साधून सजविलेल्या गौराई पाहायला मिळत आहेत. शहरामध्येही आता गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून काही ठिकाणी पेणच्या मूर्तीही विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. सार्वजनिक मंडळे, अहवालासह वर्गणी गोळा करीत आहेत. कुंभारवाड्यात कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. शहरात काही ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल लागले आहेत. घरगुती मूर्ती एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत उपलब्ध आहेत. साधारणपणे पाचशे रुपये ते दीड हजार रुपये तर मोठ्या मूर्ती या दहा हजारांपासून ते लाखापर्यंतच्या किंमतीच्या आहेत. यामध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती, मोर, सरस्वती, गरुड यावर आरुढ झालेल्या गणेशाच्या मूर्ती प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. फेटाधारी जयमल्हार, बालगणेश तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेशमूतींची भुरळ बालचमूंना पडलेली आहेे.
गणेशोत्सवात यंदाचा पर्जन्य कसा बरसेल, या अंदाजावर मोठे मंडप उभारण्याचे कामही शहरातील जुनी व प्रसिद्ध मंडळे करीत आहेत. एकंदरीतच गणेशाच्या आगमनाची चाहुल लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच लागली असून त्यादृष्टीने सर्व घटक आपापल्यापरीने गणेशाचे स्वागत करण्यात सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी ‘गणपती माझा नाचत आला’ या गाण्याची झलकही ऐकायला मिळत आहे.