स्मार्ट प्रकल्पांतर्गत क्रमवारीत फलटण बाजार समिती द्वितीय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 22 एप्रिल 2025। फलटण । स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समिती यांच्या सन 2023-24 वर्षीच्या क्रमवारीमध्ये पहिल्या शंभरमध्ये कोल्हापूर विभागातील पंधरा बाजार समित्यांचा समावेश असून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील 305 बाजार समित्यांची सन 2023-24 या वर्षासाठी वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई, कराड, सातारा आणि पाटण सहा बाजार समित्याचा राज्यातील पाहिल्या 100 मध्ये समावेश आहे.

कोल्हापूर विभागातील एकूण 21 बाजार समित्यांपैकी पंधरा बाजार समित्या राज्यातील पाहिल्या 100 क्रमवारीमध्ये कोल्हापूर विभागातील आटपाडी बाजार समिती प्रथम क्रमांकावर, फलटण बाजार समिती द्वितीय क्रमांकावर व लोणंद बाजार समिती तिसर्‍या क्रमांकावर आहे. आटपाडी बाजार समिती राज्यस्तरावर 22 व्या क्रमांकावर, फलटण बाजार समिती 24 व्या क्रमांकावर, तर लोणंद बाजार समिती 29 व्या क्रमांकावर आहे.

यामध्ये बाजार समितीकडे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा व इतर सुविधासाठी 80 गुण, बाजार समितीचे आर्थिक निकषासाठी 35 गुण, बाजार समितीचे वैधानिक कामकाज 55 गुण, इतर विशेष निकषाकरिता 30 गुण असे एकूण 200 गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारे बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी देण्यात आली आहे. राज्याच्या संचालनालयाकडून पणन स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्याकडून राज्यस्तरीय क्रमवारी घोषित करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय क्रमवारीमुळे शेतकर्‍यांना त्यांचा शेतमाल कोणत्या बाजार समितीमध्ये विक्री करावा याचा विचार करून शेतकरी आपला शेतमाल संबंधित बाजार समितीमध्ये पाठवू शकतील. बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यासाठी उपलब्ध असणार्‍या सुविधा तसेच आर्थिक व्यवहार, कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीमध्ये चालणारे कामकाज या विविध बाबींचा विचार करून क्रमवारी देण्यात आलेली आहे. यामध्ये आटपाडीसारखी तालुका स्तरावरील बाजार समिती शेतकर्‍यांसाठी राबवत असलेल्या विविध योजना, व्यापार्‍यांसाठी असणार्‍या सोयी सुविधा या अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!