
महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीने फलटणमध्ये दोन दिवसीय साहित्य जत्रा. ज्येष्ठ साहित्यिक विजय आवटी संमेलनाध्यक्ष तर स्वागताध्यक्षपदी डॉ. सूर्यकांत दोशी.
स्थैर्य, फलटण, दि. १९ : महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीने २७ व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचे आयोजन फलटण येथे करण्यात आले आहे. नवलबाई मंगल कार्यालय (श्रीचंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराजवळ) येथे गुरुवार दि. २५ आणि शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी हे दोन दिवसीय संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहासकार आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रा. डी. ए. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फलटण ही जैन धर्मीयांची ‘दक्षिण काशी’ मानली जाते. या ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमीवर होणारे हे संमेलन शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरेल. हे संमेलन दुसऱ्यांदा फलटणमध्ये होत असून यात साहित्यिक, विचारवंत, कवी आणि वाचकांची मोठी मांदियाळी जमणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक विजय आवटी भूषविणार आहेत.
असा आहे पहिल्या दिवसाचा कार्यक्रम (२५ डिसेंबर)
गुरुवारी पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी प. पू. १०८ आचार्य श्री पद्मनंदी महाराज, प. पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महाराज (कोल्हापूर) आणि प. पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज (नांदणी) यांचे सानिध्य लाभणार आहे.
त्यानंतर खालीलप्रमाणे सत्रे होतील:
-
परिसंवाद १: ‘जैन साहित्य संस्कृतीमध्ये फलटणचे योगदान’ (अध्यक्ष: प्रा. डॉ. सुधीर शास्त्री). सहभाग: डॉ. महावीर शास्त्री, प्रा. डी. ए. पाटील.
-
परिसंवाद २: ‘भारतीय चित्रपटसृष्टीत जैनांचे योगदान’ (अध्यक्ष: डॉ. पुरंदर चौगुले). सहभाग: डॉ. रावसाहेब पाटील, अनमोल कोठाडिया.
-
परिसंवाद ३: ‘जैन पत्रकारिता: दशा व दिशा’ (अध्यक्ष: डॉ. गजकुमार शहा). सहभाग: प्रा. ए. ए. मासुर्ले, डॉ. नेमिनाथ शास्त्री.
-
काव्य संमेलन: सायंकाळी विजयकुमार बेळंके यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफल रंगणार आहे.
बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष सत्रे
मुख्य सभागृहाबाहेर दुसऱ्या सभागृहात ‘बालकुमार साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. यामध्ये रंगभरण स्पर्धा आणि ‘संवाद हरवतो आहे’ या विषयावर लेखिका नीलम माणगावे मार्गदर्शन करतील. तसेच दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर) ‘आजची जैन स्त्री’ या विषयावर प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.
दुसऱ्या दिवसाची रूपरेषा (२६ डिसेंबर)
शुक्रवारी सकाळी ‘प्राचीन जैन साहित्य: एक चर्चा’ या विषयावर संजय देवगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होईल. त्यानंतर कथाकथन आणि समारोप सत्र पार पडेल. समारोप सत्रात प्राचार्य चंद्रशेखर मुरुमकर आणि दीपक पाटील हे अनुक्रमे ‘युवक युवती मूल्यवर्धन’ आणि ‘उद्योग-व्यवसाय’ या विषयांवर मार्गदर्शन करतील.
ग्रंथदिंडी आणि प्रदर्शनाचे आयोजन
संमेलनाच्या सुरुवातीला किशोरभई शहा यांच्या हस्ते व्यासपीठ उद्घाटन, भूषण दोशी यांच्या हस्ते जिनवाणी पूजन, तर शैला गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. जयश्री दोशी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार असून, प्रफुल्लता गांधी यांच्या हस्ते दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल.
या संमेलनास फलटणसह पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, गौरवाध्यक्ष किशोरभई शहा आणि संयोजन समितीने केले आहे.
