
स्थैर्य, मुंबई, दि. २८ नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकांबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका पुढे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तांत्रिक पेचामुळे निवडणूक लांबणीवर?
सध्या प्रचाराचा धुरळा उडाला असतानाच अचानक निवडणूक प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नक्की कोणते तांत्रिक कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, यामुळे निवडणूक प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
उद्या चित्र स्पष्ट होणार
याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून उद्या अधिकृत आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे. आयोगाचा आदेश आल्यानंतरच निवडणुका पुढे जाणार की ठरलेल्या वेळेत होणार, हे स्पष्ट होईल.
उमेदवारांच्या जिवाची घालमेल
फलटण आणि महाबळेश्वरमध्ये उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. लाखो रुपयांचा खर्च आणि नियोजनानंतर आता ऐनवेळी निवडणुका पुढे जाण्याच्या चर्चेने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आयोगाच्या उद्याच्या निर्णयाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
